पुणे:ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे – चापेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या शिष्यवर्गाकडून पुण्यात सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.हा सत्कार दि.६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह, कोथरुड येथे पद्मश्री डॉ.लीला पूनावाला यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या संयोजक अरुंधती पटवर्धन, स्मिता महाजन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.या कार्यक्रमात डॉ.सुचेता भिडे चापेकर यांच्या शिष्या विविध विलोभनीय नृत्यप्रकार सादर करणार आहेत.डॉ.चैतन्य कुंटे हे डॉ .सुचेता भिडे -चापेकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.हा कार्यक्रम विनामुल्य आहे.
समर्पित नृत्य जीवन: डॉ.सुचेता भिडे -चापेकर
डॉ.सुचेता भिडे -चापेकर (जन्म ६ डिसेंबर १९४८) या शास्त्रीय नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका आहेत. त्या भरतनाट्यम या नृत्य प्रकारांत निपुण आहेत. भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. गुरु, वाग्येकार आणि संरचनाकार असलेल्या सुचेता चापेकरांना संगीत नाटक अकादमीने २००७ साली पुरस्कार देऊन गौरविले आहे.
६ डिसेंबर १९४८ रोजी एका सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित घरात सुचेताताईंचा जन्म झाला.बालपण मुंबई येथे गेले. मुलीची नृत्यातली गती आणि आवड बघून स्वतः चित्रकार असलेल्या वडिलांनी त्यांना नृत्य शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.गुरु पार्वतीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे अरंगेत्रम १९६३ साली वयाच्या १५व्या वर्षी झाले. पार्वतीकुमार यांच्या नृत्य कार्यक्रमातून त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्याचप्रमाणे गुरूंच्या भरतनाट्यम नृत्यातील तंजावर येथील मराठी राजांच्या योगादानाविषयीच्या अभ्यासातही सुचेताताई त्यांच्या सहाय्यक होत्या. मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून पदवी संपादन करत असतानाच देशभर विविध ठिकाणी त्यांचे नृत्याचे कार्यक्रम होत होते. मद्रास म्युझिक अकादमी येथील त्यांच्या कार्यक्रमाला विशेष पसंती मिळाली.त्यानंतर त्यांना गुरु के.पी.किट्टप्पा यांच्याकडून भरतनाट्यम नृत्यातील प्राचीन रचना आणि कर्नाटक संगीताचे मार्गदर्शन मिळाले.
लग्नानंतर पुण्यात स्थायिक झालेल्या सुचेताताईंनी १९८२ साली पहिला विदेश दौरा केला. लंडन,पॅरीस,रोटरडॅम येथील त्यांच्या नृत्य प्रस्तुतीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रासह उत्तर भारतात त्यांनी अनेक कार्यक्रम केले. त्यादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की केवळ भाषेच्या अडचणीमुळे भरतनाट्यमसारख्या सुंदर कलेचा आस्वाद उत्तर भारतीय रसिक घेऊ शकत नाहीत. त्यातूनच मग नृत्यगंगा या अनुपम नृत्य शैलीचा जन्म झाला. १९८२ साली याचा पहिला प्रयोग मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर परर्फॉमिंग आर्ट्स येथे झाला. भरतनाट्यमचे मूळ सौंदर्य कायम राखत हिंदुस्तानी संगीतात हिंदी मराठी रचना त्यांनी सादर केल्या आणि या त्यांच्या प्रयोगाला समीक्षकांसह रसिकांचीही भरघोस दाद मिळाली.या त्यांच्या अभिनव प्रयोगासाठी त्यांनी तंजावूरच्या मराठी राजांच्या रचनांचा सखोल अभ्यास केला आणि पीएच.डी. मिळाली. शहाजीराजे,सरफोजीराजे यांच्या अनेक मराठी,हिंदी आणि संस्कृत रचनांच्या सादरीकरणातून त्यांनी नृत्यकलेत भर घातली आहे.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवात तीन वेळा नृत्य करण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला आहे. आनंदासाठी कला,कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला हे ब्रीद घेऊन त्यांनी१९८८ मध्ये समविचारी लोकांच्या बरोबर ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट ’ या कलेच्या प्रसार प्रचार करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून अनेक नृत्य कलाकार,रचनाकार आणि अध्यापक यांची जडणघडण त्यांनी केली आहे.
अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.राज्यसरकार – महाराष्ट्र गौरव पुरस्कार, सूरसिंगार संसद,मुंबई- नृत्यविलास उपाधी, राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी,नवी दिल्ली – भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानासाठीचा सर्वोच्च सन्मान,संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००७),
पुणे महापालिकेने रोहिणी भाटे यांच्या नावाने दिला गेलेला २०१५ सालचा ’स्वर्गीय गुरू पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार’.