पुणे- महापालिकेच्या प्रशासकीय काळात महापालिकेने केवळ दुर्लक्ष केल्याने एका व्यक्तीला प्राणास मुकावे लागले हि दुर्घटना शहराला लांछनास्पद असून संबधित मृत व्यक्तीच्या कुटुंबावर मोठा आघात करणारी आहे अशा महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पोलिसांकडे केली आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी कसबा पेठेतील अभिजीत राजेंद्र गुंड यांचा ओंकारेश्वर धोबी घाट येथे डोक्यात झाडाची वाळलेली फांदी पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर धोकादायक झाडाबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात पुणे महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने सदर दुर्घटना घडली. मृत आभिजीत राजेंद्र गुंड यांच्या पाठीशी आई व भाऊ असे कुटुंब असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. तरी निष्काळजीपणामुळे नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृत अभिजीत राजेंद्र गुंड यांच्या कुटुंबीयांना पुणे महानगरपालिकेकडून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात या क्षेत्राचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची आज भेट घेतली. या शिष्टमंडळामधे माझ्यासह गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, एड. स्वप्नील जोशी, केतन औरसे, श्री कामठे, सौरव गुंजाळ उपस्थित होते.