वन व्यवस्थापनाकडे शास्त्र म्हणून पाहावे: महादेव मोहिते
‘प्रोजेक्ट टायगर’ व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त उपक्रम
पुणे :महाराष्ट्राच्या व्याघ्र प्रकल्पातील सर्वोत्कृष्ट गाईड’ हा पुरस्कार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर मधे काम करणाऱ्या शहनाज बेग यांना जीविधा संस्थेतर्फे माहिती उपसंचालक डॉ .राजू पाटोदकर, उपवसंरक्षक महादेव मोहिते, जीविधा संस्थेचे संस्थापक राजीव पंडीत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.वृंदा पंडीत, ओमकार बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शुक्रवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण कलादालन येथे हा कार्यक्रम झाला.
भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला’ पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वन्यजीव संवर्धनाच्या या यशस्वी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवाचे कौतुक करण्यासाठी ‘जीविधा’ संस्थेतर्फे आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शनात हा पुरस्कार देण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह असे स्वरूप होते.
यावेळी बोलतांना डॉ.पाटोदकर म्हणाले, ‘वाघाची संख्या वाढत नेली पाहिजे. हे अवघड काम आहे.ते जतन केले पाहिजेत. वाघ दाखविण्याचे काम करणारे पर्यटक मार्गदर्शक हे काम महत्वपूर्ण आहे. या कामाला समजून घेतले पाहिजे. जनजागृती च्या कामात त्यांचा मोठा वाटा आहे.
महादेव मोहिते म्हणाले,’ एक वाघ जगविण्यासाठी 500 हरणे असणे, दोनशे एकर जंगल लागते. वन व्यवस्थापन त्यासाठी महत्वाचे असून त्या कडे शास्त्र म्हणून पाहिले पाहिजे. गवताळ प्रदेश जपले पाहिजेत. पुणे जिल्ह्यात लांडगे चांगले आहेत, तेही टिकणे आवश्यक आहे.
शहनाज बेग म्हणाल्या, ‘ ताडोबा भागातच जन्मल्या ने आणि वन खात्याची पार्श्वभूमी घराला असल्याने हे काम सोपे गेले.निसर्ग, जंगलावर प्रेम केले पाहिजे.गाईड होणे आव्हानात्मक आहे, ते पेलले पाहिजे. पर्यटक देखील खुप माहिती देतात. त्यातून आम्ही शिकत राहतो.
राजीव पंडीत म्हणाले,’ पर्यटक मार्गदर्शक हे पर्यटन क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. योग्य प्रशिक्षण, दृष्टिकोन आवश्यकच आहे. स्थानीक माणूस जगला तर प्राणी जगणार आहेत. निसर्ग संवर्धनात त्यांचे योगदान मोलाचे ठरते.
२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड, पुणे येथे ‘व्याघ्र प्रकल्पाची पन्नास सोनेरी वर्षे’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाद्वारे वाघांच्या संवर्धनात ‘ व्याघ्र प्रकल्पांची’ भुमिका , स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, व्याघ्र प्रकल्पांसमोरील भावी काळातील आव्हाने यासारख्या विषयांची माहिती पोस्टरद्वारे करून दिली जात आहे.
शहनाज बेग महाराष्ट्रातील पहिल्या महिला गाईड आहेत व ताडोबा मधील पुरूष गाईडचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी लढा देऊन महिलांना गाईड बनण्यासाठी प्रोत्साहन दिले व अनेक महिलांना गाईड म्हणून तयार केले.
जीविधा संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित हे गाईडना ट्रेनिंग देण्याचे व लोकांना जंगलात घेऊन जाण्याचे काम करतात. त्यामुळे या सत्कार समारंभा नंतर शहनाज बेग, मोहिते ,राजीव पंडित यांच्याशी ओमकार बापट यांनी संवाद साधला.
या अभिमानास्पद प्रकल्पाची माहिती मिळवण्यात समाजाचा सहभाग असावा, म्हणून जीविधा संस्थेतर्फे यावर्षी प्रौढांसाठी पोस्टर स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा अशा तीन स्पर्धांचे आयोजन केले आहे.निबंध, चित्रकला व पोस्टर स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार समारंभ रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता माजी नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
‘प्रोजेक्ट टायगर’ची ५० वर्षे
पन्नास वर्षे भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला पंन्नास वर्षे पूर्ण झाली. तत्कालीन पंतप्रधान माननीय श्रीमती इंदिरा गांधी यांनी १ एप्रिल १९७३ ला प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पाची घोषणा केली. त्यावेळेस ९ जंगलं व्याघ्र प्रकल्पांतर्गत संरक्षित केली गेली. सध्या भारतात ५४ व्याघ्र प्रकल्प आहेत. जगातील ७० टक्के वन्य वाघ भारतात आहेत हे प्रोजेक्ट टायगरचे यश आहे. भारतात सरकारने आपल्या राष्ट्रीय प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प निर्माण करणे, शिकारीविरोधात कायदे लागू करणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये लोकसमुदायाच्या सहभागास प्रोत्साहन देणे यासारखी अनेक पावले उचलली आहेत.