घटनेची जलद गतीने सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी.
मुंबई/पुणे : पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शनिवार दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामधील आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत.
तसेच आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत. यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकारी नेमावा. सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्ज शीट कोर्टामध्ये दाखल करावे. पीडित अल्पवयीन मुलगी व तिचे पालक यांचे समुपदेशन करण्यात यावे. सदर पीडित अल्पवयीन मुलीला मनोधैर्य योजनेतून ताबडतोब मदत देण्यात यावी. पीडितेच्या पुनर्वसनासाठी व तिच्या पुढील शिक्षणासाठी तिला सर्वोतोपरी सहकार्य करावे. पोलिस व या केससाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने अनिता शिंदे , आश्लेषा खंडागळे व हिंगांशी वाडेकर पाठपुरावा करत आहेत . या केस साठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधीत पोलीस आयुक्तांना निर्देश दिले. आज डिसीपी स्मार्तना पाटील यांनी पुणें पोलींसांच्या कार्यवाहीचा अहवाल नीलम गोर्हेंना दिला .
सदर घटनेबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ उपसभापती कार्यालयास सादर करण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.