कर्जत-कुटुंब नियोजनाच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जोरदार टोला हाणला. भविष्यातील आव्हाने पाहता सर्वांनी 1 किंवा 2 अपत्यावर थांबावे. मुलगा वंशाचा दिवा असतो असे काही नाही. मुलीही वंशाचा दिवा चांगला लावतात असा काहींना अनुभव आहे, असे ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये 2 दिवसीय अधिवेशन सुरू आहे. त्याच्या समारोपीय भाषणात अजित पवारांनी कुटुंब नियोजन व समान नागरी कायद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी कुटुंब नियोजनाच्या मुद्यावर आपले मत मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांना टोला हाणला. काळाची गरज ओळखून सर्वांनी एक किंवा दोन मुलांवर थांबले पाहिजे. मुलगा वंशाचा दिवा असतो असे काही नाही. दोन्ही मुली झाल्या तरी चांगलेच आहे. मुली वंशाचा दिवा चांगल्या पद्धतीने लावतात असा काहींना अनुभव आहे, असे ते म्हणाले.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, सद्यस्थितीत जगात भारतात सर्वाधिक तरुणवर्ग आहे. पण आणखी 20 वर्षांनी आपला आकडा 160 कोटींवर जाईल. यात काही हयगय होणार नाही. आपण तिथपर्यंत पोहोचूच. त्यावेळी हाच भारत जगातील सर्वात वृद्ध देश होईल. त्यामुळे आपण भविष्यावर गांभिर्याने विचार केला पाहिजे.पुढच्या पीढीच्या भवितव्यासाठी आपल्याला एक किंवा दोन अपत्यांवर थांबले पाहिजे. यासाठी कायदा करण्याची गरज असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा. कोणत्याही जातीने, पंथाने, धर्माने किंवा देव अथवा अल्लाहने एवढी पैदास करा म्हणून सांगितले नाही. एक-दोन अपत्यांवर थांबले नाही प्यायलाही पाणी मिळणार नाही. घरांचीही व्यवस्था करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी समान नागरी कायद्यावर विचार केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
समान नागरी कायद्याच्या मुद्यावर मागसवर्गात काही गैरसमज आहेत. या कायद्यामुळे आरक्षणाला धक्का लागेल असे त्यांना वाटते. पण तुमचे आरक्षण कुणीही काढू शकत नाही. कुणीही राज्यकर्ते आले तरी ते बदलणार नाही. त्यामुळे समान नागरी कायद्याचा मुद्दा जनतेने मनावर घेतला पाहिजे. राजकीय पक्षांनीही या प्रकरणी भूमिका घेतली पाहिजे. कुणाच्या मनात काही शंका कुशंकाी असतील तर त्यावर चर्चेने तोडगा काढला जाईल. पण पुढच्या पीढीच्या भविष्यावर आजच विचार करण्याची गरज आहे. या प्रकरणी वेगवेगळे मतप्रवाह असले पाहिजे. पण त्यावर चर्चा झालीच पाहिजे, असे अजित पवार यावेळी समान नागरी कायद्याचे समर्थन करताना म्हणाले.कुटुंब नियोजनाच्या मुद्यावर यापूर्वी आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी एक 5 कलमी कार्यक्रम आणला होता. पण त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. त्याचा अतिरेक झाला. त्यामुळे त्याची किंमत आगामी निवडणुकीत इंदिरा गांधी यांना मोजावी लागली. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ द्यायचा नाही. त्यावर चर्चा करून तोडगा काढायचा. त्यामुळे कुटुंब नियोजन व समान नागरी कायद्यावर सर्वांनी विचार करावा, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.