सांगा देशाचं विभाजन कुणी केलं? काश्मीरचा प्रश्न कुणी प्रलंबित ठेवला? आतंकवाद कुणामुळे निर्माण झाला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला काही सवाल विचारत जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशाचं विभाजन कुणी केलं? काश्मीरचा प्रश्न कुणी प्रलंबित ठेवला? आतंकवाद कुणामुळे निर्माण झाला? बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कारापासून वंचित कोण ठेवलं?. आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात नक्षलवाद कमजोर पडला आहे. गडचिरोली आता पोलादाचं शहर म्हणून ओळखला जातं. कडू कारलं साखरात घोळा किंवा तुपात तळा, ते कडूच राहणार, अशी कॉंग्रेसची अवस्था आहे. ते कधीच सुधरू शकत नाही.
चंद्रपूर -बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी करत आहेत. तर नकली शिवसेनेवाले हे हिंदुत्वाला शिव्या देणाऱ्या डीएकमेवाल्यांना महाराष्ट्रात आणून रॅली करतात, कॉंग्रेससोबत नकली शिवसेना आहे,मला आनंद आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहे.” असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तर कॉंग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी केवळ परिवारांचा विकास केला. त्यांना देशाचं काही देणं-घेणं नाही. कॉंग्रेस म्हणजे कडू कारल्यासारखे आहे. ते कधीच सुधरू शकत नाही, असा निशाणा मोदींनी लगावला.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये दाखल झाले होते. भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला त्यांना संबोधित केलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चंद्रपूरमधून मला खूप प्रेम मिळालं आहे. विशेष बाब म्हणजे, अयोध्येतल्या भव्य राम मंदिर निर्माणासाठी चंद्रपुरातूनच लाकूड पाठवण्यात आलेलं होतं. एवढंच नाही तर नव्या भारताची ओळख असलेल्या नवीन संसदेच्या इमारतीसाठीही चंद्रपूरचं लाकूड वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळे चंद्रपूरची ख्याती संपूर्ण देशात पोहोचलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकसभा 2024 ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता याच्यामधली आहे. एकीकडे भाजपप्रणित एनडीए आहे. या एनडीएचं ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की, जिथे सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खावी. इंडिया आघाडी नेहमी देशाला अस्थितरतेकडे नेलं आहे. एका स्थिर सरकारची आवश्यकता किती आहे हे महाराष्ट्राशिवाय कोण सांगू शकेल, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेच्या सुरूवातीलाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, इंडिया आघाडीवाले राज्यात वेगवेगळ्या क्लृपत्या लढवून सत्तेत आले तेव्हा त्यांनी फक्त स्वत:चा विकास केला. स्वत:च्या कुटुंबाचा विकास केला. कुणाचा किती वाटा असेल, कुणाला कोणतं कंत्राट मिळेल, मलाईदार पोस्ट कुणाच्या खात्यात आणि किती येणार या हिशोबातच यांनी पूर्ण महाराष्ट्राचं भविष्य गुरफटून टाकलं होतं. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित प्रोजेक्ट पाहिल्यावर हे म्हणायचे की, कमिशन आणा नाहीतर काम बंद करा. या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. बळीराजा जलसिंजवनी योजना बंद केली. विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनासाठी योजना होती ती योजनाही त्यांनी ठप्प केली होती, असे म्हणत मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.