पुणे :भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला’ पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वन्यजीव संवर्धनाच्या या यशस्वी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवाचे कौतुक करण्यासाठी ‘जीविधा’ संस्थेतर्फे आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते झाले.
२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड, पुणे येथे ‘व्याघ्र प्रकल्पाची पन्नास सोनेरी वर्षे’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाद्वारे वाघांच्या संवर्धनात ‘ व्याघ्र प्रकल्पांची’ भुमिका , स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, व्याघ्र प्रकल्पांसमोरील भावी काळातील आव्हाने यासारख्या विषयांची माहिती पोस्टरद्वारे करून दिली जात आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते बुधवार , २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता झाले.जीविधा संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले. वृंदा पंडित यांनी आभार मानले. राजेंद्र आवटे,प्रज्ञा सातारकर, अभिजित ताम्हणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘कान्हा द प्रोटेक्टिंग पॅराडाईज ‘ या माहितीपटाचे प्रसारण यावेळी करण्यात आले.संगीता राठी यांनी सूत्रसंचालन केले.
सुनील लिमये म्हणाले,’ भारतात वाघांची संख्या वाढत आहे.पण ही ठिकाणे विखुरलेली आहेत.वाघांना अभयारण्यात राहावेसे वाटणे, पिले देता यावेत असे अधिवास तयार करणे महत्वाचे आहे. नामिबियातून भारतात चित्ते आणणे हा सकारात्मक प्रयोग असून त्याला वेळ दिला पाहिजे. प्राणी विश्वात नवनवीन प्रयोग होत राहिले पाहिजेत.जंगल बघायला शिकले पाहिजे.
प्राण्यांचे अस्तित्व सगळ्यासाठी गरजेचे आहेत. वाघाचे अस्तित्व हे चांगल्या परिसंस्थेचे लक्षण आहे. म्हणून वाघांचे रक्षण केले पाहिजे. वाघांना एका अभयारण्यातून दुसऱ्या अभयारण्यात जाण्यासाठी आवश्यक कॉरिडॉर जपले पाहिजेत. वाघाकडून माणूस मारला जातो, तेव्हा मानवी चुका त्यात असण्याची शक्यता जास्त असते. अभयारण्यात बंदी असलेल्या भागात माणसांनी जावू नये.बिबट्यापासून जपण्यासाठी काळजी घेण्याचे उपाय लोकांनी ऐकले पाहिजेत.गवा शहरात आला तरी गर्दी करून संकट निर्माण करता कामा नये. वन खात्याला काम करु द्यावे.
वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलात गेले पाहिजे. जंगलं आणि प्राण्यांचे महत्त्व सांगा. पाणी मुरवणे हे जंगलाचे काम आहे. हेही महत्त्वाचे कारण आहे. शहरात झाडाचे आच्छादन वाढवले पाहिजे.
राजीव पंडित म्हणाले, ‘जैव विविधता जपण्यासाठी जागृती आणि लोक शिक्षण करण्याचे काम जिविधा करते. विविध प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो. अभयारण्यातील गाईड्स ना प्रशिक्षण देत असतो. १९९० पासून काम करत आहोत.पण,तेच प्रश्न व्याघ्र प्रकल्पात अजून आहेत. नवे विकासाचे प्रश्न ही निर्माण झाले आहेत. कॉरिडॉर खंडित होत आहेत. लोकसहभाग वाढावा यासाठी स्पर्धा घेण्यात आले. गाईड हेच जंगलाचे, अभयारण्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. त्यासाठी गाईड निवडून पारितोषिक देत आहोत.
त्यासोबतच या वर्षीपासून जीविधा संस्थेचे वतीने ‘महाराष्ट्राच्या व्याघ्र प्रकल्पातील सर्वोत्कृष्ट गाईड’ हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचा पहिला मानकरी म्हणून जीविधा ने नेमलेल्या समितीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर मधे काम करणाऱ्या शहनाज बेग यांची निवड केली आहे. त्यांचा सत्कार शुक्रवार ,१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सात वाजता करण्यात येणार आहे. शहनाज बेग महाराष्ट्रातील पहिल्या महिला गाईड आहेत व ताडोबा मधील पुरूष गाईडचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी लढा देऊन महिलांना गाईड बनण्यासाठी प्रोत्साहन दिले व अनेक महिलांना गाईड म्हणून तयार केले.या कार्यक्रमाला वनखात्याचे पुणे शहराचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रविण उपस्थित राहणार आहेत. त्यांनी ताडोबा चे फिल्ड डायरेक्टर म्हणून काम बघितले आहे. जीविधा संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित हे गाईडना ट्रेनिंग देण्याचे व लोकांना जंगलात घेऊन जाण्याचे काम करतात. या सत्कार समारंभा नंतर शहनाज बेग, एन.आर. प्रवीण व राजीव पंडित यांची मुलाखतीचा कार्यक्रम असणार आहे .
तीघांच्या एकत्र मुलाखती मधून व्याघ्र प्रकल्पाविषयी विविध अंगाने माहिती पुणेकरांना मिळेल.
या अभिमानास्पद प्रकल्पाची माहिती मिळवण्यात समाजाचा सहभाग असावा, म्हणून जीविधा संस्थेतर्फे यावर्षी प्रौढांसाठी पोस्टर स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा अशा तीन स्पर्धांचे आयोजन केले आहे.निबंध, चित्रकला व पोस्टर स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार समारंभ रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता माजी नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
‘प्रोजेक्ट टायगर’ची ५० वर्षे
पन्नास वर्षे भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला पंन्नास वर्षे पूर्ण झाली. तत्कालीन पंतप्रधान माननीय श्रीमती इंदिरा गांधी यांनी १ एप्रिल १९७३ ला प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पाची घोषणा केली. त्यावेळेस ९ जंगलं व्याघ्र प्रकल्पांतर्गत संरक्षित केली गेली. सध्या भारतात ५४ व्याघ्र प्रकल्प आहेत. जगातील ७० टक्के वन्य वाघ भारतात आहेत हे प्रोजेक्ट टायगरचे यश आहे. भारतात सरकारने आपल्या राष्ट्रीय प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प निर्माण करणे, शिकारीविरोधात कायदे लागू करणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये लोकसमुदायाच्या सहभागास प्रोत्साहन देणे यासारखी अनेक पावले उचलली आहेत.

