मुंबई
उघडपणे टिपू सुलतानचा उदोउदो करता येत नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी केली का ? असा सवाल मुंबई भाजपतर्फे ट्विट करून उबाठा गटाला विचारण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र आले आहेत याची प्रचिती आता येत असल्याचेही यावेळी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीची सांगलीतील सभा’ सुरू होण्यापूर्वी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मंचावरील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू नये, असे सांगितले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या सूचना फेटाळत टिपू सुलतान यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच भरसभेत याबाबत सांगत पोलिसांना इशारा दिला. यावरून मुंबई भाजपतर्फे उबाठा गटाला धारेवर धरण्यात आले. ज्याने असंख्य हिंदूंची कत्तल केली ज्याने अनेक लोकांचे बळजबरी धर्मांतर करून त्यांचा अमानुष छळ केला अशा धर्मांध विकृती असलेल्या टिपू सुलतानचे पूजन महाराष्ट्रात होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही असा इशारा मुंबई भाजपा कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.

