भाजपा नगरसेवक पंकज यादव यांच्या मागणीला यश
मुंबई दिनांक ४ एप्रिल २०२४
मागील काही दिवसांपासून मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वातावरणातील प्रदूषणाच्या स्तरामुळे श्वसन विकारही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जोगेश्वरीतील ट्रॉमा हॉस्पिटल जंक्शनवर प्रदूषण नियंत्रण मशीन बसविण्याची मागणी भाजपा माजी नगरसेवक पंकज यादव यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर तातडीने प्रशासनाने एअर प्युरिफायर मशीन बसवून जोगेश्वरीतील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. यासाठी प्रयत्नशील असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांचे स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत.
वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पत्र लिहून माजी नगरसेवक पंकज यादव यांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. अखेरीस हे काम पूर्ण झाल्याने जोगेश्वरीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.