पुणे:शहरातील पब, बिअर बार आस्थापनांना रात्री दीड वाजेपर्यंतची वेळ यापूर्वीच ठरवून दिली आहे. परंतु आता रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर यांनाही रात्री दीडपर्यंत परवानगी राहील.तर रस्त्यालगतच्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सना रात्री साडेअकरानंतर बंद ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
देशी दारूच्या दुकानांना सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत वेळ आहे. त्यांनाही वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, दारूच्या दुकानाजवळ अंडाभुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मद्यपी दारू पितात. त्यामुळे अशा अंडाभुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शहरात रस्त्यावर किरकोळ कारणावरून मारहाणीच्या घटना वाढत आहेत. यापुढे रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ‘स्ट्रीट क्राईम’ आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना यापुढे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. संघटित गुन्हेगारी टोळ्यांतील गुन्हेगार, फरार आरोपी, बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची धरपकड सुरू आहे. शहरात नाकाबंदी आणि बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी कोंढवा, भारती विद्यापीठ, चतु:शृंगीसह सर्व पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.