संजय काकडेंनी मांडल्या कार्यकर्त्यांच्या व्यथा आणि वास्तव…मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर पसरलेल्या नाराजीवर समजूत काढण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी भेट घेतली संजय काकडेंची…
Lok Sabha Election 2024 पुणे: पुण्यात भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागलीय. पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. काकडे यांनी थेट फेसबूकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारीसाठी जे इच्छुक होते त्यातील एक, माजी खासदार संजय काकडे यांनी आज पक्षाने दिलेल्या उमेदवाराबाबत एकूणच नागरिकात किती नाराजी आहे याबाबतची माहिती राज्यातील मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्याची माहिती येथे समजते आहे.
दरम्यान याबाबत सोशल मिडीयावर एक पोस्ट हि काकडे यांनी केली आहे. या मध्ये त्यांनी असे म्हटले आहे कि
,’राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माझे मित्र श्री रवींद्र चव्हाण यांनी आज माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली.यावेळी मी माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातील उमेदीची 10 वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली हे त्यांना सविस्तराने सांगितले. तसेच, पुणे लोकसभा मतदार संघातील वास्तव स्थितीदेखील मी त्यांना सांगितली. मी त्यांना सांगितलेल्या माझ्या वेदना आणि पक्ष हिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक व केंद्रीय गृहमंत्री आदरणीय श्री अमितभाई शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी मला या भेटी दरम्यान दिला. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे.
हि पोस्ट त्यांनी पंतप्रधान मोदी,अमित शहा, जे पी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांना # tag ने जोडली आहे.
मात्र उमेदवार बदला असे थेट कुठेही संजय काकडे यांनी म्हटलेले नाही
माढा आणि अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागलीय. पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आणि नागरीकातून नाराजी व्यक्त केली जातेय. काकडे यांनी तर थेट फेसबूकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षशिस्त म्हणुनच त्यांनी त्या मर्यादित शब्दातून व्यक्त केल्या असाव्यात.
काकडे नाराज असल्यामुळेच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे वृत्त आहे.या भेटीत त्यांनी आपल्या वेदना आणि पुणे लोकसभेचं वास्तव चव्हाणांसमोर मांडल्याचं काकडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्या भावना पोहचवण्याचं आश्वासन चव्हाणांनी दिल्याचं काकडेंनी सांगितलं.
सारी पदे कोथरूडला आणि महापालिकेच्या’त्या’ पदाधिकाऱ्यांचा कारभार
कसबा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातील मुख्य कारण महापालिकेतील भाजपा 2 पदाधिकारी यांनी केलेला ५ वर्षातील कारभार असल्याचेच काही जण मानतात,मोहोळ हे या ५ वर्षात स्थायी समिती अध्यक्ष,महापौर अशा पदांवर सर्वाधिक काळ होते या काळात खुद्द तत्कालीन खासदार बापट यांना सुद्धा या कारभाराचा फटका बसत होता.त्यामुळे बापट यांना थेट पालकमंत्र्यांच्या बैठकीतून सभात्याग करावा लागला, ,आयुक्तांच्या बंगल्यावर आंदोलन करावे लागले होते.असे असताना,शिवाय कोथरूडला महापौर,स्थायी समिती अध्यक्ष,पालकमंत्री, शिक्षण मंत्री आणि आता राज्सयभा सदस्य अशी सारीच पदे दिलेली असताना पुन्हा कोथरूडच्याच मोहोळ यांना निवडणुकीत महापालिकेतील त्यांचाच कारभार आणि स्वभाव पराभूत करेल अशी स्थिती दिसत असताना, त्यांनाच भरभरून दिल्यासारखी उमेदवारी देणे उचित नाही असे म्हणणे देखील काहींनी सातत्याने मांडलेले आहे.