भारतभरातून ८० लघुपटांचा सहभाग
पुणे : पुणे पेशवा लघुपट महोत्सवात भट्टी’ लघुपटाने प्रथम क्रमांक पटकाविला. या लघुपट महोत्सवात देशभरातील ८० लघुपट सहभागी झाले होते. त्यामधून ४७ शॉर्ट फिल्म स्क्रिनींगसाठी निवडण्यात आल्या. महोत्सवाचे आयोजन घोले रस्त्यावरील नेहरु सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते.
अनुप सुजाता ढेकणे हे महोत्सवाचे दिग्दर्शक होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे डॉ. प्रवीण भोळे, अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर,माजी नगरसेविका गायत्री खडके, दिग्दर्शक प्रीतम पाटील, राजेंद्र आलमखाने उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. सहदिग्दर्शक म्हणून राम दत्ताकला, नियंत्रक म्हणून श्रीनिवास गायकवाड, तर सभासद म्हणून मुबारक तांबोळी, प्रदीप गरड, रिहान शेख, समर्थ सोनावणे, राजेंद्र कुलकर्णी, राजेंद्र पालवे यांनी काम पाहिले. महोत्सवाचे यंदा पहिले वर्ष होते.
पारितोषिक वितरणासाठी मेघराज भोसले, गणेश इनामदार, संग्राम भोसले उपस्थित होते. वीरेंद्र वळसंगकर आणि मितेश ताके यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. भट्टी लघुपटाने महोत्सवात प्रथम तर रेखा, लालीपॉप यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले. आधाशी लघुपटाने पुणे पेशवा चॉईस अवॉर्ड हा पुरस्कार पटकाविला.
चिथिका लघुपटाला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार, रेखा लघुपटाला सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार, लालीपाॅप चित्रपटाला सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफर कॉलम लघुपटाला तर सर्वोत्तम लेखक पुरस्कार भट्टी, सर्वोत्तम बालकलाकार पुरस्कार झीलमील आणि पाखरं लघुपटाने पटकाविला.