बारामती-शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी 12 तारखेला 12 वाजता उमेदवारी अर्ज भरत विरोधकांचे 12 वाजवणार असा निर्धार केला आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली अखेरची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच बारामतीत पवार रुपी हुकुमशाही संपवण्यासाठी माझे धर्मयुद्ध आहे असा हल्लाही त्यांनी केला.
यावेळी बोलतांना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मी जिंकण्यासाठी लढत असून माझी लढाई पवारांविरोधात असल्याचे विजय शिवतारे म्हणाले. पुढे ते म्हणाले, ”अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तेव्हा तुम्ही गप्प राहिला. शरद पवार यांना देखील माहित आहे शिवाजी विजय शिवतारे कोण आहे. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम असल्याची घणाघाती टीका शिवतारे यांनी केली.तसेच यावेळी ते म्हणाले की, ”राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मी शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगितले जातं आहे. मात्र मला फक्त अजित पवार यांचा पराभव करायचा आहे. मी लढतोय ते जिंकण्यासाठी. त्यामुळे 1 तारखेला पालखी तळावर सभा घेणार आणि 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार”, अशी माहिती शिवतारे यांनी दिली.
त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. शिवतारे यांनी ग्रामीण दहशतवादी शब्दही वापरला. ते म्हणाले की ”ग्रामीण दहशतवाद शरद पवारांनी केला. माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अजित पवारांनी खूप पाप केली आहेत. अख्ख्या राज्याला ग्रामीण दहशतवाद शब्द माहिती पडेल. ईस्ट इंडिया कंपनी आहे ती गेली आणि पवारांची कंपनी आली. अजित पवार आणि शरद पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस अशा दोघांचा खात्मा करायचा आहे”, असा तिखट हल्ला शिवतारे यांनी केला आहे