पुणे- पुण्यात शरद पवार यांच्या सहा सभा होणार आहेत आणि आता उद्या पासून किंवा फक्त दोनच दिवसात कॉंग्रेसचे पुण्यातील निष्ठावंत , ज्येष्ठ नेते आबा बागुल कॉंग्रेसच्या प्रचारासाठी सर्वात पुढे दिसतील असा विश्वास लोकसभेसाठी कॉंग्रेसने दिलेले उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट होताच माध्यमांना सांगितले. मोहन जोशी, प्रशांत जगताप यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होते.
ते म्हणाले ,बागुल ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे मार्गदर्शनाचा खजिना आहे. त्यांची नाराजी रास्त आहे पण पक्षाच्या निर्णयाचा ते सन्मान करतीलच. त्यांचा स्वभाव सर्वांना ठाऊक आहे ते रंगीत आहेत तेवढेच प्रेमळ आहेत , आमचे नेते ,आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत निश्चित काढू आणि पक्षाचा ते सन्मान करतील याचा आम्हाला विश्वास आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, या भेटीदरम्यान पवारसाहेबांनी मला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नेहमीप्रमाणेच आजचीही भेट अतिशय उर्जादायी होती. पुढील काळात पुणेकरांचा आवाज म्हणून लोकसभेत जाण्यासाठी फार मोठी प्रेरणा या भेटीमुळे मिळाली. लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी, दडपशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीला जनता भरभरून आशीर्वाद देईल, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.