- डॅगर परिवाराकडून मास्टर बुरहानचे उत्साहात स्वागत
पुणे : बारामुल्ला येथील मास्टर बुरहान हा नऊ वर्षाचा चिमुकला विद्यार्थी हृद्यविकाराच्या यशस्वी शस्त्रकियेनंतर डॅगर परिवार शाळेत परतला आहे. जीवघेण्या आजारातून बुरहान पुन्हा शाळेत परतल्याने संपूर्ण डॅगर परिवारासह भारतीय लष्कराच्या डॅगर विभागाने आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्यावतीने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
बुरहानला हृदयविकार हा गंभीर आजार असल्याचे निदान झाले होते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकिय उपचार घेणे शक्य नव्हते. त्यामुळे भारतीय लष्कराच्या डॅगर विभाग आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ यांच्या मदतीने दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये बुरहानवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. गत महिन्यात ही शस्त्रकिया पार पडली. तेंव्हापासून त्याचे शिक्षक आणि सहकारी विद्यार्थी त्याच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानुसार बुरहान नुकताच डॅगर परिवारात परतला. यावेळी सर्व परिवाराने त्याचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत केले. बुरहानवरील यशस्वी शस्त्रक्रियेने भारतीय लष्कराच्या मानवतावादी दृष्टीकोनाचे दर्शन घडले. त्यामुळे लष्करासह ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने आनंद व्यक्त केला आहे.
‘‘बुरहानला नवीन जीवन देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉक्टर आणि त्याच्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या त्याच्या मित्रांसह सर्वांचेच आम्ही मनापासून आभार मानतो. डॉक्टरांकडील दवा आणि आपल्या सर्वांचा दुवा यामुळं बुरहान ठणठणीत बरा झाला, याचा अत्यंत आनंद वाटतो. त्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!’’
पुनीत बालन
(अध्यक्ष, इंद्राणी बालन फाऊंडेशन)