पुणे, दि. २०: कारागृहातील बंद्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विज्ञान आदी क्षेत्रातील प्रसिद्ध पुस्तके संगणकावर पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ई-लायब्ररीची सुविधा सुरु करण्यात आली असून या लायब्ररीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक डॉ. भाईदास ढोले, पी. पी. कदम, आर. ई गायकवाड, एम. एच. जगताप, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंदा कांदे आदी उपस्थित होते.
कारागृहातील बंद्यांसाठी ‘ई-लायब्ररी’ हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या ई-लायब्ररीमध्ये विविध पुस्तके पीडीएफ स्वरुपात संगणकावर बंद्यांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली असून या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक भावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे, असे कारागृहाच्यावतीने कळविण्यात आले आहे.