एमएसएमई उद्योजकांसाठी एमएसएमई मंत्रालय आणि इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या वतीने मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
पिंपरी, पुणे (दि. २० मार्च २०२४) उद्योजकांनी व्यवसाय वृद्धीसाठी सातत्यपूर्ण कार्याची जोड दिली तर प्रगती साधता येईल असे प्रतिपादन एमएसएमई विकास आणि सुविधा कार्यालय मुंबईचे सहायक संचालक अभय दप्तरदार यांनी केले.
केंद्र सरकारच्या एमएसएमई विकास आणि सुविधा कार्यालय मुंबई आणि इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकांसाठी एमएसएमई स्पर्धात्मक (LEAN) योजनेवर जनजागृती कार्यक्रमाचे (MCLS) आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक सागर शिंदे, राजेश चव्हाण, संतोष तिडके, विजयराव देशमुख आदी उपस्थित होते.
दैनंदिन कामकाजाचे योग्य प्रकारे नियोजन करावे. उद्योजकाने प्रत्यक्ष कामात सहभागी न होता आपला मौल्यवान वेळ व्यवसाय वृध्दी, बाजारातील मागणी, नवीन तंत्रज्ञान या बाबींवर लक्ष केंद्रित करून पुढील धोरण निश्चित करण्यासाठी वापरता येईल, यातूनच उद्योजक आपली प्रगती साध्य करून देशाच्या विकासात हातभार लावू शकतात असे दप्तरदार यांनी सांगितले.
सागर शिंदे यांनी इंजिनिअरिंग क्लस्टरच्या कार्याचा आढावा घेतला. अभय दप्तरदार, मॅग्निफिकोचे संचालक राजेश सहस्त्रबुद्धे, सॅम स्क्वेअरचे संचालक प्रदीप कुलकर्णी आणि क्रेडियन्सच्या संचालिका प्राची कुलकर्णी यांनी तांत्रिक बाबींवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सागर शिंदे यांनी आभार मानले.