बारामती:राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. 17) बारामतीत महायुतीच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांची त्यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील हे आता स्पष्ट होत असून आज चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी तब्बल पाऊण तास चर्चा केली. आजच्या भेटीत चंद्रकांत पाटील यांच्या समवेत आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, संदीप खर्डेकर जय पवार, संभाजी होळकर, जय पाटील, आदी उपस्थित होते.
सकाळी सव्वा दहाच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांचे बारामतीत आगमन झाल्यानंतर ते थेट सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी गेले. आतमध्ये यादीतील लोकांनाच प्रवेश दिला गेला. भेटीनंतर ते थेट पक्षकार्यालयात भेटीगाठींसाठी गेले.
जाण्यापूर्वी सर्वांनी विजयाची खूण करत फोटोसाठी पोझही दिली. या बैठकीत निवडणूकीच्या संदर्भात समन्वयाच्या दृष्टीने चर्चा झाल्याची माहिती असून महायुतीचा उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी करण्याबाबत व्यूहरचना आखण्याबाबतही विचारविनिमय झाला.
दरम्यान रविवारी दिवसभरात चंद्रकांत पाटील बारामतीतीलसमन्वय बैठकीस उपस्थित राहतील, माजी नगराध्यक्ष सुनील पोटे, भाजपचे सरचिटणीस अविनाश मोटे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे, संजय वाघमारे, रंजन तावरे यांच्या घरी सदिच्छा भेटी गाठी घेणार आहेत.