प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधितून साडेआठ कोटी रुपयांचा निधी
पुणे, 13 जून : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येत असलेल्या वसतिगृहाचे भूमिपूजन खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.
कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर यांच्या खासदार निधितून या वसतिगृहासाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वसतिगृहात 280 विद्यार्थिनींची निवास व्यवस्था होणार आहे.
जावडेकर म्हणाले, ‘मुलींच्या शिक्षणाने देशात मोठी क्रांती घडली आहे. एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यातील आणि देशातील विविध भागांतून पुण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. या मुलींच्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज वसतिगृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.’
जावडेकर म्हणाले ‘पुणे विद्यापीठ ही माझी पहिली कर्मभूमी आहे. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून, सिनेट मेंबर म्हणून जवळजवळ 15 वर्षे मी विद्यापीठात विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्या अनुभवाचा मला पुढील राजकीय, सामाजिक जीवनात मोठा उपयोग झाला. पुणे विद्यापीठाबद्दल माझ्या मनामध्ये आत्मीयता आहे. म्हणून मी ही सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.’
जावडेकर पुढे म्हणाले, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा वाढणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमांची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मोठे योगदान राहील, असा विश्वास वाटतो.’
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात नव्या डिझाईनिंग सेंटरसाठी अद्ययावत यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या उद्देशाने 46 लाख रुपये आणि मिलेनियम स्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबच्या धरतीवर उत्तम प्रयोगशाळा उभारण्यासाठी 40 लाख रुपयांचा खासदार निधी जावडेकरांनी उपलब्ध करून दिला आहे.