पुणे: पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार असल्याची. प्रतिक्रिया पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर होताच व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हेच माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे.
पक्षाने माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीची मी विनम्रपणे स्वीकारतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवू हा सार्थ विश्वास आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार आहे. या दृष्टीने गेल्या दहा वर्षात पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. ही विकासाची गंगा पुढे नेत पुणे शहराला जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख निर्माण करायची आहे.
याबरोबर शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी पुन्हा एकदा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. पी. आय. चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि महायुतीच्या नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करीन. असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.