सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव आणि स्वयंरोजगार परिषदेचेही उद्घाटन होणार
मुंबई-
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 11 मार्च 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील भूखंड क्रमांक 83 ए येथे एमएसएमई -तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी होणार आहे. यावेळी मंत्रीमहोदय सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव आणि स्वयंरोजगार परिषदेचेही उद्घाटन करतील. यावेळी एमएसएमई एएस अँड डीसी अर्थात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकता मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि विकास आयुक्त डॉ. रजनीश आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर अतिथी देखील उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांद्वारे तंत्रज्ञानातील प्रवेशाचा विस्तार करण्यासाठी देशभरात 20 नवीन तंत्रज्ञान केंद्रे आणि 100 विस्तार केंद्रांची स्थापना करत आहे. सिंधुदुर्ग मधील एमएसएमई -तंत्रज्ञान केंद्राचा अंदाजे प्रकल्प खर्च 182 कोटी रुपये आहे. हे तंत्रज्ञान केंद्र सामान्य अभियांत्रिकी आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल आणि नवीन तंत्रज्ञान, कौशल्य आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन आसपासच्या भागातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी वाढीच्या नवीन संधी निर्माण करेल.
दिनांक 09.03.2024 पर्यंत, मंत्रालयाच्या उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत महाराष्ट्रातील 53.97 लाख एमएसएमई पैकी, सिंधुदुर्गमधील सुमारे 38,000 उद्योग नोंदणीकृत आहेत, जे जिल्ह्यातील 1.25 लक्ष लोकांना रोजगार देतात. सिंधुदुर्ग तंत्रज्ञान केंद्र हे प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरेल. यामुळे परिसरातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील आणि एक उर्मी निर्माण होईल.
उद्या या कार्यक्रमांबरोबरच पीएम विश्वकर्मा विषयक प्रदर्शनाचे उद्घाटनही नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. पीएम विश्वकर्मा योजना 17.09.2023 रोजी माननीय पंतप्रधानांनी सुरू केली होती. ही एक सर्वसमावेशक योजना असून ती 18 व्यापारांशी संबंधित कारागीर आणि शिल्पकारांना संपूर्ण पाठबळ प्रदान करते. दिनांक 10.03.2024 पर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 1.43 कोटी अर्ज सादर करण्यात आले आहेत.