पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. १० मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर पार पडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ. शशिकला राय यांनी ‘गांधीजीं सोबत मैत्री ‘ विषयावर मार्गदर्शन केले.डॉ. कुमार सप्तर्षी यांनी ‘ सत्याग्रहशास्त्र ‘ या विषयावर मार्गदर्शन केले, तर मुंबईचे पत्रकार सोहित मिश्रा यांनी ‘ महात्मा गांधी आणि आजचे वर्तमान ‘ या विषयावर मार्गदर्शन केले.’ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे अकरावे शिबीर होते.
डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन,डॉ.प्रवीण सप्तर्षी,सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) ,संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ) , जांबुवंत मनोहर ( राज्य कार्यवाह, युक्रांद ),अप्पा अनारसे(संघटक,युक्रांद),सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) आदी मान्यवर उपस्थित होते.नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
डॉ.शशिकला राय म्हणाल्या,’आपलयाला स्वातंत्र्य जसे समजले नाही, तसेच गांधीजी समजले नाहीं. कारण ते समजून घेण्याची मानसिकता नाहीं. गांधी ही व्यक्ती नाहीं तर प्रतीक आहे.गांधी बनणे ही एक प्रक्रिया आहे. स्वतः गांधी ही प्रक्रिया जगले. जगभरात अनेक व्यक्ती या प्रक्रियेतून मानवतेचे नेते झाले.रक्ताचा एकही थेंब न सांडता जगात काही करता येते, हे गांधीजींनी दाखवून दिले.प्रचारातून असत्याला सत्य बनवता येत नाही.ज्याला प्रेम समजते अशा कोणालाही गांधी समजून सांगणे सोपे आहे. नव्या पिढीला समजून सांगण्या इतके गांधी संभाषण स्नेही आहेत’.हिंदी आणि मराठी साहित्यातील गांधीजींबद्दलच्या लेखनाचा मागोवाही डॉ.शशिकला राय यांनी या भाषणात घेतला.
डॉ.सप्तर्षी म्हणाले, ‘ गांधीजी हे व्यक्ती म्हणून समजून घेण्याबरोबरच त्यांचे अन्याय विरुद्ध लढणे हे अभ्यासणे गरजेचे आहे. सत्याग्रह हे शास्त्र म्हणून त्यांनी विकसित केले. ही त्यांनी जगाला दिलेली देणगी आहे.अहिंसा ही दुबळ्यांची नसते, इतरांना मारण्याची ताकद असून जे मारत नाहीत, ती शूरांची अहिंसा असते.मुस्लिमबहुल भाग पाकिस्तान झाला. हिंदूबहुल भाग धर्मनिरपेक्ष देश बनला, या कारणातून गोडसे याने गांधीजींची हत्या झाली.तरीही गांधी विचार अमर झाला आणि जगभर जिवंत राहिला’.