महाबळेश्वर – साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत. अत्यंत गुप्तता पाळत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रविवारी पहाटे महाबळेश्वरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मेटगुताड येथील संबाला हॉटेल पहाटे बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आले. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला, अशी तीन अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्सा महाबळेश्वर तालुक्यात विनापरवाना अनाधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. आजमितीला सुमारे 120 बांधकामे अनधिकृत आहेत. या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. त्यानुसार महसुल विभाग, पोलीस, ग्रामविकास विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने अत्यंत गुप्तता पाळून रविवारी पहाटे मेटगुताड, गुरेघर येथील अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.यापूर्वी सुरू करण्यात आलेली कारवाई मध्यंतरी थांबली होती. ती पुन्हा सुरू झाली आहे. रविवारी पहाटे गुरेघर येथील डोंगर कड्यावर नव्याने सुरु असलेले अंदाजे 5 हजार स्वेअर फुटचे बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केलं. पहाटे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टरच्या साह्याने प्रशासनाने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळे महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.महाबळेश्वर येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार रविवारी (दि.10) पहाटे प्रशासनाने धडक कारवाई करत बांधकामांवर हातोडा मारला. वाईचे प्रांताधिकारी राजेश जाधव, महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील, वाईच्या तहसिलदार सोनाली मेटकरी, खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, पाचगणीचे मंडल अधिकारी चद्रकांत पारवे, महाबळेश्वरचे मंडल अधिकारी खटावकर, आणि सर्व तलाठ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.