मुंबई: महिला समाजाला आधार देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्यात समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद आहे. महिलांकडे एक त्यागाचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाते. अन्याया विरुद्ध लढण्याचे काम, ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेना महिला आघाडी करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, उपनेत्या कलाताई शिंदे, शितल म्हात्रे, आशाताई मामेडी, संध्या वाढावकर, सचिव मनीषा कायंदे, ज्योती मेहेर, शिल्पा देशमुख, ठाण्याच्या महापौर मीनाक्षीताई शिंदे, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, श्री गजानन पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये, महिला बचत गट, लेक लाडकी, लखपती योजना, बस प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, महिला बचत गटांना सक्षम भांडवल उभा करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले आहेत यामध्ये पंधरा हजारावरून तीस हजार रुपये रक्कम करण्यात आली आहे यांसह अनेक निर्णय राज्य सरकारने महिलांच्या हिताच्या दृष्टीने राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
आपलं सरकार हे सर्वसमान्यांच सरकार असून ते सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीच्या सरकारमध्ये सण, उत्सव या सर्वांवर बंदी घालण्यात आली होती. आपलं सरकार आल्यानंतर सर्व सण उत्सवावर असलेली बंदी उठवून टाकण्यात आली. आपली संस्कृती जोपासणे, वाढवणे हे आपलं कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देखील महिलांसाठी अनेक योजना राबवत महिलांना सक्षम करण्याचे काम केले आहे. यामध्ये उज्वला योजना, बेटी बचाव बेटी पढाव यासोबतच महिलांच्या नावावर घर असल्यास टॅक्समध्ये सवलत देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशा प्रकारची योजना राबविण्यात येत आहे. जवळपास तीन कोटीपेक्षा अधिक महिलांना त्याचा फायदा झाला असल्यास त्यांनी सांगितले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले विमा योजनेची पाच लाखापर्यंत मर्यादा वाढवण्यात आली यामधील अटी शर्ती काढून टाकल्याने त्याचा सर्वांना फायदा घेता येणार आहे हा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
नुकतेच राज्य सरकारने महिला धोरण जाहीर केले आहे यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक भरीव कार्य होणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
सरकारने घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिवसेना महिला आघाडीने केले पाहिजे तसेच शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन जनतेचा सरकार दरबारी होणाऱ्या फेऱ्या थांबवण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जवळपास चार कोटी लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला असून त्या मार्फत लोकांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याचे कार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आजच्या शिवदुर्गा महिला मेळाव्याचा संकल्प असा आहे की, “दिल्ली मुंबईत आमचं तोरण हेच आमचे महिला धोरण” यानुसार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना परत एकदा मुख्यमंत्री आपल्याला करायचे आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक महिलेत शिवदुर्गा संचारावी अशा प्रकारची ही संकल्पना घेतलेली असल्याचे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.
काल आठ मार्चला महिला धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं, त्याच्यात म्हटलेले आहे की महिलांमध्ये गुंतवणूक करा आणि प्रगतीला वेग द्या, महिलांच्यासाठी म्हणून अनेक योजनांची माहिती मुख्यमंत्री कक्षाकडून वेळोवेळी दिली जात आहे. अनेक योजना सरकार राबवत आहे मात्र त्या योजना कशा प्रकारे राबवायच्या या संदर्भात या मेळाव्यातून महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच महिला मतदारांना कामांमध्ये ज्या अडचणी येतात त्याचे निरसन करणे, कुठल्या कुठल्या योजनांवरती तुम्हाला माहिती पाहिजे यावरही मेळाव्यातून मार्गदर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर राजकारणामध्ये काही गोष्टी आवश्यक असतात, एक म्हणजे आरक्षण महिलांना मिळालेल आहे. पंचायत राज मध्ये ५०% महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळालेली असून महिलांनी अतिशय हुशारीने आणि चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला महिलांसाठी आरक्षण लोकसभा आणि विधानसभेत जाहीर केलेल आहे. लवकरच याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरणातून आपण सगळेजण मिळून विकास साधायचा आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी वेगवेगळ्या दिशेने पंख हलवून उपयोग होणार नाही तर सगळ्यांनी दिशा ठरवली पाहिजे आणि एकत्र पंख हलवले पाहिजेत, एकमेकीला धक्का नाही मारला पाहिजे आपण सगळ्यांची दिशा सांभाळून घेतली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आजच्या कार्यक्रम हा पहिला आणि शेवटचा कार्यक्रम नसून यापुढे देखील तो राज्यभरात आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये बऱ्याच महिलांनी वेगवेगळे सहा विषय सुचवलेले आहेत यामध्ये, कौशल्य, समाज माध्यमांचा उपयोग करणं, महिलांच आरोग्य, महिला विषयक झालेले नवीन कायदे, नुकतंच जाहीर झालेला महिला धोरण आणि अतिशय महत्त्वाचा असतं ते म्हणजे स्त्रियांनी नेटवर्क किंवा सातत्याने कशा पद्धतीने सामुहिक काम करावं याच्या कार्यपद्धती अशा अनेक विषयांवर आगामी काळात काम केले जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
आगामी निवडणुक प्रचारात राज्य सरकारने राबविलेल्या अनेक योजनाबद्दल बोलले जाईल मात्र महिलांनी सर्वांपर्यंत पोहोचवावी अशी योजना म्हणजे, आनंदाचा शिधा यामध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय मनोहरजी जोशी यांनी पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. नंतरच्या काळात मी विधिमंडळात दरवर्षी मागणी करायचे की स्त्रियांना चण्याची डाळ, गुळ तसेच मैदा, तेल या गोष्टी दिल्या पाहिजेत पण त्यावेळच्या सरकारने ऐकून न ऐकल्यासारखे केले होते, परंतु शिंदे सरकारने हे सगळं मान्य केलं आणि प्रत्येक सणवाराला गोरगरिबांच्या घरामध्ये आनंदाचा शिधा पोहोचवला याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला रणरागिणी हा शब्द दिला होता नुसतं बघायचं नाही तर वेळप्रसंगी प्रतिकार करायचा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम आपण करूयात. शिवसेनेमुळे महिला सुरक्षित आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने महिला रणरागिणी म्हणून काम करण्यास सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.