अजितदादा पूर्वी म्हणत महापालिका निवडणूका घेऊन दाखवा , आता ते त्यावर स्पष्टीकरण देऊ लागलेत
जे अजितदादा सत्तेत जाण्यापूर्वी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुक का ढकलता ? का घेत नाहीत ? घेऊन दाखवा असे जाहीर आव्हान भाजपाला देत तेच अजित दादा आता सत्तेत आल्यावर या निवडणुका का पुढे गेल्यात ,का रखडल्या याचे स्पष्टीकरण देऊ लागलेत.
पुणे-वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी त्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले. मात्र रखडलेल्या पालिका निवडणुकांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये सवाल- जवाब झाल्याचे पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांनी भाषणात आधी मागणी केली तर त्यावर अजित पवार यांनीही प्रत्युत्तर दिलेयावेळी बोलतांना सुप्रिया सुळे यांनी (अजितदादा सत्तेत जाण्यापूर्वी म्हणत महापालिका निवडणूक घेऊन दाखवा, याकडे अप्रत्यक्ष लक्ष वेधत) ”माझी राज्य सरकारकडे मागणी आहे. इथे अनेक दिवस नगरसेवक नाही, गेल्या दोन-अडीच वर्षांत इथे निवडणूक न झाल्यामुळे या भागातल्या जनतेनं कुणाकडे प्रश्न मांडावेत? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी नगरसेवकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळे नगरसेवकांची निवडणूक आपण लवकरात लवकर घेतली, तर या भागातल्या लोकांना मोठा आधार मिळेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तर अजित पवार यांनीही त्यांच्या भाषणात सुप्रिया सुळे यांच्या या मागणीवर प्रत्युत्तर दिले आहे. ”दोन वर्षांपेक्षा जास्त काळ महानगर पालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. पण त्या सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या आहेत. आम्हीही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी असं आम्हालाही वाटतं. पण सर्वोच्च न्यायालयात ओबीसी यासंदर्भातला एक मुद्दा गेला आहे. त्याचा निकाल लवकर लागत नाहीये. राज्य सरकार सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात याच मताचं महायुतीचं सरकार आहे”, असे अजित पवार म्हणाले.
मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय- अजितदादा
तर दुसरीकडे अजित पवार यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे असे विधान केले. ते म्हणाले- आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोंदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. ही गाठ मनाशी बाळगा आणि पुढील काही वर्षात अजून विकासाला चालना मिळेल, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे.