UPA सरकारने सबसीडी देऊन गॅस सिलिंडर ४०० रुपयांना दिले, मोदी सरकारने तर सबसीडीच बंद केली.
मुंबई, दि. ८ मार्च
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची चाहूल लागल्याने भारतीय जनता पक्ष एक एक जुमले फेकत आहे. महिला दिनाचे औचित्य साधत गॅस सिलिंडर १०० रुपयाने कमी केला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत ४५० रुपयांनी गॅस सिलिंडर देण्याचे होर्डींग लावले पण सत्ता येऊनही अद्याप ४५० रुपयांचे सिलिंडर काही आले नाही. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळीही दोन सिलिंडर मोफत देऊ असे जाहीर केले पण तेथेही हे दोन मोफत सिलिंडर दिलेले नाहीत. निवडणुकीआधी किमती कमी करणे हा भाजपाचा चुनावी जुमला आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना अतुल लोंढे यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, २०१४ च्या आधी भारतीय जनता पक्षाला ‘महंगाई डायन’ वाटत होती पण महागाई प्रचंड वाढली असतानाही तीच महागाई आता भाजपाला ‘डार्लिंग’ वाटू लागली आहे का? २०१४ पर्यंत युपीए सरकार सबसीडी देऊन गॅस सिलिंडर ४१० रुपयांना देत होते परंतु भाजपाचे मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी ही सबसीडी शून्यावर आणली आणि ४१० रुपयांचा गॅस सिलिंडर १२०० रुपयापर्यंत महाग केला. पेट्रोल, डिझेलच्या बाबतीतही युपीए सरकारच्या काळात कच्चे तेल ११२ डॉलर प्रति बॅरल होते तेव्हा ७२ रुपये लिटर पेट्रोल होते. युपीए सरकार ३.५४ रुपये कर आकारत होते तो कर मोदी सरकारने वाढवून ३३ रुपये केला आहे. या करातून मोदी सरकारने ३५ लाख कोटी रुपये जनतेकडून लुटले. आज १०६ रुपये लिटर पेट्रोल असतानाही ते महाग असल्याचे वाटत नाही का? आज गॅस सिलिंडर १०० रुपयाने कमी केला यावर भाजपा ढोल बडवत असला तरी माता भगिनी त्यांच्या या फसव्या घोषणांना बळी पडणार नाहीत.
‘मोदी सरकार’ जाहीरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. या जाहिराती ‘मोदी सरकार’च्या आहेत. देश किंवा सरकार कोणा व्यक्तीचे नसते त्यामुळे या जाहिरातींचा खर्च भाजपाने केला पाहिजे पण तो सरकारी तिजोरीतून केला जात आहे म्हणजेच जनतेचा पैसा आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहेत, असेही अतुल लोंढे यांनी सांगितले.