मुंबई, दि. २९- कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधरण्यासाठी तसेच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना होणारा त्रास व पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी तसेच नागरीकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत सामान्य रुग्णालय, शास्त्रीनगर, डोंबिवली येथे नवीन शवविच्छेदन केंद्र सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील शासन निर्णय काढला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता तसेच शासन स्तरावर पाठपुरावा केला होता.
गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसा कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत सामान्य रुग्णालय, शास्त्रीनगर, डोंबिवली येथे प्रस्तावित नवीन शवविच्छेदन केंद्र सुरु करण्याकरिता आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे निरीक्षणे नोंदवून संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचे ना हरकत देण्याकरिता संचालनालयामार्फत गठित त्रिसदस्यीय समितीने शिफारस केली होती . सदर शिफारशीच्या अनुषंगाने आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत सामान्य रुग्णालय, शास्त्रीनगर, डोंबिवली येथे शवविच्छेदन केंद्र सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.