पुणे- चाकण परिसरात अल्पवयीन मुलांनी आपल्या एका मित्राची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. कहर म्हणजे या आरोपी मुलांनी आपल्या मित्राची हत्याच केली नाही, तर त्याच्या हत्येचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टेटसवरही ठेवला. यामुळे अवघे पुणे हादरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. मृत अल्पवयीन मुलगा आपल्या 2 मित्रांसह मद्यपान करत होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून वाद सुरू झाला. त्यात मृत मुलाने आपल्या मित्राच्या कानशिलात हाणली. हे पाहून मुख्य आरोपी संतापला. त्याने थेट मृताच्या डोक्यात दगड घातला. यात तो जागीच गतप्राण झाला. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतले आहे. मृत अल्पवयीन मुलावर 4 महिन्यांपूर्वीच खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. तर हत्या करणाऱ्यांपैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल होता.आरोपी 2 अल्पवयीन मुलांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. त्यात मुख्य आरोपी मृतकाच्या डोक्यात दगड घालताना दिसून येत आहे. आरोपींनी हा व्हिडिओ आपल्या इन्स्टा अकाउंटवर ठेवला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओच्या आधारावर चाकण पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आहे.