पुणे : मेट्रो स्टेशनवर शाळकरी मुलांची जमलेली गर्दी…चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल… समोरून मेट्रो येताच मुलांचे खुललेले चेहरे… सायन्स पार्कमधील तारांगणात जमिनीवर राहून अवकाशात मारलेला फेरफटका… लढाऊ विमानाची प्रतिकृती… मनोरंजक वैज्ञानिक उपकरणे पाहून हरखलेली मुले… असा अद्भुत अनुभव नुकताच वस्ती भागातील मुलांनी घेतला.
वंचित विकासतर्फे अभिरुची वर्ग, फुलवा प्रकल्पातील वस्ती भागात राहणाऱ्या मुलांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मेट्रो सफर व पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. नगरकर युथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज यांचे सहकार्य लाभले. तिन्ही संस्थांच्या वतीने मुलांना खाऊवाटप करण्यात आले.
जनता वसाहत, दांडेकर पूल, अप्पर-सुप्पर इंदिरानगर, सिंहगड रोड आदी १५ वस्त्यांमधील अभिरुची वर्गातील मुलांनी तर लालबत्ती विभागातील फुलावाच्या मुलांनी या सफरीचा आनंद लुटला. यावेळी २०० मुले व ५० हून अधिक पालक, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. मेट्रोचे शुभम दळवी यांनी मेट्रोविषयी मुलांना सविस्तर माहिती सांगितली. मेट्रोच्या अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
संस्थेच्या संचालक सुनीता जोगळेकर म्हणाल्या, “मागील ३८ वर्षांपासून समाजाच्या विविध घटकांच्या विकासासाठी काम करत असलेल्या वंचित विकास संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अभिरुची वर्गात मुलांना जीवन कौशल्य शिक्षण देण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव, पोषक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सहल,चित्रकला,हस्तकला इ. विविध उपक्रमातून केला जातो. नैसर्गिक साधन संपत्तीचा आनंद घेण आणि तिची जोपासना करण, रक्षणं करणं इ. मूल्यशिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून मुलांना मिळतात. छोट्याप्रमाणेच मोठ्यांनाही या सफरीतून त्यांचे बालपण पुन्हा अनुभवायला मिळाले.
प्रथमच मेट्रोमध्ये बसणाऱ्या या मुलांना मेट्रोची माहिती, चढते-उतरते सरकते जिने, चेकइन इ. शिस्तबद्ध प्रणाली अनुभवता आली. सायन्स पार्कमध्ये विज्ञान खेळणी, थ्रीडी शो आणि तारांगणाचा अद्भुत अनुभव घेतला. कोणत्याही दडपणाखाली नसलेली, मुक्तपणे बागडणारी मुले आपसूकच या सारख्या उपक्रमांतून शिस्त, नियोजन, अशा विविध गोष्टी शिकतात. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते, असेही त्यांनी नमूद केले.
फुलवा प्रकल्पाच्या सुप्रिया धोंगडे, अभिरुची वर्गाच्या प्रकल्प प्रमुख स्नेहल मासालीया यांसह अभिरुची वर्गाच्या सर्व ताईंनी सहल यशस्वी करण्यास परिश्रम घेतले तर सहलीचे नियोजन तेजस्विनी थिटे यांनी केले.