श्रीगोंदे-
श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवाचे सुमारे ५० किलो अंदाजे ३० लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरुन नेले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले. निषेध सभेत या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असून चोरट्यांचा शोध तत्काळ घेऊन आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली.
पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिराचा चोरट्यांनी मुख्य दरवाजा कटवणीच्या सहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सुद्रिकेश्वर महाराजांचे चांदीचे सिंहासन चोरुन नेले. या घटनेचे चित्रीकरण मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. घटनेची माहिती पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास श्रीगोंदे येथील व्यापारी कुटुंबासह दर्शनासाठी आले असताना त्यांना दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला असल्याचे दिसून आले.