पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ.विवेक सावंत ( कृत्रिम बुद्धिमत्तेचे जग आणि महात्मा गांधी ),डॉ. कुमार सप्तर्षी( सत्याग्रह शास्त्र ), डॉ. जॉन चल्लादुराई ( अहिंसा :तत्व आणि व्यवहार ) या मान्यवरानी मार्गदर्शन केले.’ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे दहावे शिबीर होते.
सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी),संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ) , मच्छिंद्र गोरडे,सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल), जांबुवंत मनोहर (राज्य संघटक युवक क्रांती दल),ज्ञानेश्वर मोळक , आदी मान्यवर उपस्थित होते.
आज महात्मा गांधी असते तर त्यांनी सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आय. ए. चा वापर अतिशय कल्पकतेने आणि सर्जनशीलपणे केला असता, ज्याची आपण कल्पनाच करू शकणार नाही, कारण गांधींजी हे अतिशय प्रतिभावान आणि सर्जनशील विचार करणारं व्यक्तीमत्व होते. असे मत विवेक सावंत यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधींवर आजवर या जगात जेवढे लिखाण झाले, होत आहे, जेवढा विचार विनिमय होतो आहे, तसेच महात्मा गांधींची असंख्य छायाचित्रे उपलब्ध आहेत, ती जर ज्याला ज्याला शक्य आहे, त्यांने हा गांधींचा सर्व ऐवज, महिती, ज्ञान जर आय.ए. ला कृत्रिम बुद्धिमत्तेला दिले तर त्याचा प्रचंड आणि प्रभावी परिणाम नक्कीच दिसून येईल. आणि गांधींचं अमरत्व आणखी परिणामकारक रित्या वाढेल, यात गांधी स्मारक निधीने नेतृत्व स्वीकारले पाहिजे, असे मतही सावंत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्तता अधोरेखित केली.
अशा प्रकारे गांधींची सर्वांगीण माहिती, ज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेला मिळाल्यास, निखील वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी महात्मा गांधी काय म्हणाले असते? असा प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारताच त्याने गांधींंसारखा विचार करून उत्तर दिले असते, किंवा या पुढेही अशा अनेक प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला, कोणत्याही परिस्थितीत महात्मा गांधींच्या विचारधारे नुसार, अनेक समस्यांवर उत्तरे देऊ शकेल, असा आशावादही सावंत यांनी या वेळी व्यक्त केला.
कृत्रिम बुद्धिमत्तेला खरेतर न- मानवी बुद्धिमत्ता असे म्हणायला हवे, कारण मानवी भावभावनांचे ज्ञान, जाणीवा या कृत्रिम बुद्धिमत्तेला प्राप्त होणे अवघड आहे! कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ माणसांच्या यंत्रवत हालचालींची नक्कल करू शकतो, मानवी मनाची त्याला सर येणार नाही, अशी भूमिकाही सावंत यांनी स्पष्ट केली.
जय समाज व्यवस्था एकूणच मानवाला आणि सजीवांना जगण्यासाठी सुखकर, सुकर आणि न्याय्य झाली तर या जगात हिंसेला जागा राहणार नाही, असेच विचार महात्मा गांधी यांनी वेळोवेळी मांडले, त्यामुळेच ते एका येशूचे तत्व “शत्रूवरही प्रेम करा” असे सांगणार्या फादरला गांधी म्हणाले “पण मला शत्रूच नाही” या गांधी़च्या विधानात आपल्याला अहिंसात्मक जगण्याचा मार्ग सापडू शकेल, असे मत डॉ. दुराई यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप बर्वे यांनी केले.