पुणे- राष्ट्र सेवा दल, निळू फुले सभागृह, सिंहगड रोड येथे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे हे येत असताना खंडोजी बाबा चौकात त्यांची गाडी अडवुन दगडफेक करून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्याने तसेच सेनादत्त पोलिस चौकी येथे पुन्हा वागळेंच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जणांना अटक केली आहे.त्यामध्ये दिपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, बापु मानकर, स्वप्नील नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांचा समावेश आहे. पुढील तपास अजूनही सुरु आहे व कारवाई अद्याप अपूर्ण आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
पुणे शहरामध्ये काल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या “निर्भय बनो” सभेपूर्वी त्यांच्या गाडीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्या दरम्यान वागळे यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. संध्याकाळी डेक्कन आणि दांडेकर पूल परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आल्याने विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. वागळे यांच्यावर हल्ला झाल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या महायुतीच्याकाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी अटक केली आहे.
निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या “निर्भय बनो” या सभेचे दांडेकर पूल परिसरामध्ये असणाऱ्या साने गुरुजी स्मारक येथे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वागळे यांच्याकडून करण्यात आलेल्या पोस्टमुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. सभा उधळून लावण्याचा इशारा देखील त्यांच्याकडून करण्यात देण्यात आला होता. काल संध्याकाळी सरोदे यांच्या घरातून निघाल्यापासून वागळे यांच्या गाडीवर चार ते पाच वेळा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.