रामचंद्र पोतदार लिखीत ‘मुकद्दर का सिकंदर’ पुस्तकाचे प्रकाशन
पिंपरी, पुणे (दि.९ फेब्रुवारी २०२४) मनुष्य जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळते. पण भगवंताशी एकरूप होण्यासाठी त्याच्याशी जोडण्यासाठी आपले कर्म चांगले असले पाहिजे. धर्म आणि कर्म चांगले असेल तर त्याचे चांगले फळ मिळते. भगवंत आपल्या पाठीशी उभा राहतो. म्हणूनच ‘संगत आणि पंगत चांगली असली पाहिजे’ असे म्हणतात. जगामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे; संतांनी ज्ञानप्राप्तीसाठी ग्रंथ लिहिले. ग्रंथांच्या अभ्यासातून आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊन; आपण सुखी समाधानी आयुष्य जगू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक हभप किसन महाराज चौधरी यांनी केले.
रामचंद्र पोतदार यांनी लिहिलेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी निगडी, प्राधिकरण येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या केंद्रात करण्यात आले. यावेळी उर्मिला दीदी, संगीता दीदी, नेत्रा दीदी, स्वाती दीदी, लेखक रामचंद्र पोतदार, प्रकाशक रामचंद्र पंडित आदी उपस्थित होते.
मनुष्याच्या जीवनात ज्ञान रूपी प्रकाश पडला की त्याचे आचरण, विचार प्रगल्भ आणि समृद्ध होतात. त्यातून मनुष्य जीवन सुसफल होते. जीवन सार्थकी लागण्यासाठी नित्यनेमाने परमात्म्याची प्रार्थना केली पाहिजे. जसे आपण प्रार्थना करत जाऊ त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल. भगवान शिव बाबांनी विश्वकल्याणासाठी त्याच्या सानिध्यात आणि सहयोगात येण्यासाठी कर्मयोग, धर्मयोग याचे आचरण करण्यास सांगितले आहे. आपले चांगले आचरण आपल्याला भगवंताच्या कृपाछत्राकडे घेऊन जाते, असे उर्मिला दीदी यांनी सांगितले.
‘मुकद्दर का सिकंदर’ या पुस्तकांमधून अध्यात्माकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. मनुष्य वृद्धावस्थेकडे झुकला की अध्यात्माकडे वळतो. परंतु बालपणापासूनच अध्यात्माचे धडे गिरवले तर सुसंस्कृत संस्कारित पिढी तयार होईल. देव सगळ्यांच्या सुखासाठी आपल्या मागे उभा आहे. आपण कर्माला दोष देतो आणि विनाकारण त्रस्त होतो. या पुस्तकामध्ये कर्म, धर्म, मोक्ष यावर सविस्तर भाष्य करण्यात आले आहे, असे लेखक रामचंद्र पोतदार यांनी सांगितले.
स्वागत नेत्रा दीदी आणि सूत्रसंचालन स्वाती दीदी यांनी केले. या कार्यक्रमास प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.