पुणे : सध्याचे नवनवीन तंत्रज्ञान व व्हर्च्यअल रिअलिटीमुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे डिफफेक तंत्रज्ञान, ज्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बाॅलीवूडमधील बड्या कलाकारांनीही चिंता व्यक्त केली आहे. या तंत्रज्ञानामुळे एकंदर व्यक्तिस्वातंत्र्य देखील धोक्यात आले आहे. त्यामुळे आता या गोष्टींचे गांभीर्य ओळखून व्हर्चुअल पासून एक्चुअल रिअॅलिटीकडे सर्वांनी वळायला हवे, असे मत महिला बालकल्याण विभागाचे आयुक्त डाॅ.प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केले.
एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ संचलित ‘स्कूल ऑफ लॉ’ व बृहन महाराष्ट्र अकादमी यांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या सहकार्याने आयोजित ‘एम्पॉवरमेंट समिट २०२४’ व ‘महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी बोलत होते. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. महेश चोपडे, महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, ‘एमआयटी स्कुल ऑफ लॉ’च्या अधिष्ठाता डॉ. सपना देव, बृहन महाराष्ट्र अकादमीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, एम. तिरुमल आदी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना ‘महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला विभागाच्या संगीता पाटील, केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालक झेलम चौबळ, झेप फाऊंडेशन मुंबईच्या डॉ. रेखा चौधरी, ‘सिफा सिंगापूर’च्या अध्यक्षा डॉ. शिल्पा स्वार, ग्रॅव्हिट्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, उद्योजिका राजश्री गायकवाड यांचा समावेश होता.
सोशल मीडिया, सायबर क्राईम आणि स्त्रीयांची मानसिकता यावर परिसंवाद तसेच ऑनलाइन सुरक्षेशी संबंधित कायदेशीर प्रक्रियांचे व्यावहारिक प्रशिक्षण, गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यासाठी महिलांकडे आवश्यक असणारी कौशल्ये आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यासह आंतरराष्ट्रीय कायदेशीर मानके, कायदेशीर अंमलबजावणीचे निरीक्षणे अशा विविध विषयांवर या चर्चासत्रांमध्ये उहापोह करण्यात आला.
प्रास्ताविक डाॅ. सपना देव यांनी केले. आभार शशिकांत कांबळे यांनी मानले.
महिला या कुटूंबव्यवस्थेचा व एकंदर समाजव्यवस्थेचा मुख्य पाया असतात. महिलांच्या योगदानाशिवाय कुठल्याही क्षेत्राची आता कल्पना देखील करवत नाही. महिला या कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत, त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये अहोरात्र झटणाऱ्या व आपल्या कार्यातून समाजावर प्रभाव टाकणाऱ्या अशा प्रतिभावान स्त्रीयांचा सन्मान एमआयटी संकुलात होणे आमच्यासाठीही गौरवाची गोष्ट आहे.
– प्रा. डाॅ. मंगेश तु. कराड, कुलगुरू तथा कार्याध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.