रामराज्य सहकारी बँकेच्या मोबाईल बँक ॲप सेवेचा लोकार्पण सोहळा
पुणे : डिजिटल युगामध्ये तळागाळातील माणसापासून ते कोट्याधीश उद्योजकापर्यंत सर्वजण बँकिंग व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन मोबाईल बँकिंग चा वापर करत आहे. यामुळे बँकिंग व्यवहार वाढण्याबरोबरच व्यवहारांमध्ये पारदर्शकताही येत आहे. ऑनलाइन बँकिंग क्षेत्रामधील स्पर्धा लक्षात घेता ऑनलाइन मोबाईल बँकिंग सेवा नसेल तर बँकेचे खातेदार वाढणार नाहीत आणि छोट्या बँका स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाहीत, अशी भावना महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केली.
रामराज्य सहकारी बँकेच्या मोबाईल बँक ॲप सेवेचा लोकार्पण सोहळा अनिल कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बिबवेवाडी येथील मुख्य शाखेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी बँकेच्या अध्यक्षा नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते, बँकेचे संस्थापक विजयराव मोहिते, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते व बँकेचे संचालक आदी यावेळी उपस्थित होते.
अनिल कवडे म्हणाले बदलत्या काळाबरोबर सहकारी बँकांनी आणि विशेषतः छोट्या बँकांनी तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. तसेच संचालक मंडळांमध्ये तरुण व तंत्रज्ञान आणि विज्ञान याची माहिती असणाऱ्या संचालकांची भरती केली पाहिजे. जर ऑनलाईन बँकिंग नसेल तर तरुण खातेदार सहकारी बँकांमध्ये येणार नाहीत, याची जाणीव संचालक मंडळाला असायला हवी. त्या दृष्टीने बँकेच्या व्यवहारांमध्ये सुरळीतपणा, पारदर्शकता, सहजता आणि विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे.
नंदा लोणकर म्हणाल्या, झोपडपट्टीवासियांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी बँकेची स्थापना झाली. आजही छोटे उद्योजक आणि रिक्षाचालकांना बँक सहज आर्थिक पुरवठा करते. त्यांच्या विश्वासावरच बँकेची आतापर्यंत प्रगती होऊ शकली आहे. बँकेला मोठ्या उद्योजकांची आवश्यकता आहेच परंतु बँक ही छोट्या आणि तळागाळातील व्यक्तींना छोटी कर्ज पुरवठा देऊन आपला विकास साधण्यास अधिक आग्रही आहे.
ॲड.सुभाष मोहिते म्हणाले, उद्योजकांना कोट्यावधींची कर्ज देण्याऐवजी छोट्या व्यापाऱ्यांना आणि तळागाळातील व्यक्तींना छोटी कर्ज देऊन त्यांचा विकास साधण्याकडे बँकेचे उद्दिष्ट आहे. बँकेचा सध्या नेट एनपीए २.३२% असून डिपॉझिट ₹.१५१ कोटी आहेत. हे डिपॉझिट पुढील वर्षापर्यंत ₹. १७५ कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा बँकेचा मानस आहे. खातेदार आणि संचालक मंडळ यांच्या विश्वासावर आम्ही निश्चितच हे उद्दिष्ट गाठू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमावलीमध्ये बँकेचे व्यवहार असल्यामुळेच बँकेला रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू करण्यास मुभा दिली आहे. ऑनलाइन मोबाईल बँकिंग सेवेमुळे बँकेचे खातेदार आणि आर्थिक व्यवहार वाढण्यास निश्चितच मदत होईल आणि त्यामधून बँकेचा विकास अधिक भरभराटीने होऊ शकेल.
विश्व नागरी सहकारी पतसंस्था, विकास बुक एजन्सी, न्यू आशीर्वाद मेडिकल, दिलीप निवानगुडे, सुजाता वाघ, अल्ताफ भाई मर्चंट, जवाहर शहा, नगरसेवक सुनील बिबवे, विजय पोकळे, विजय कुंभारकर, निशा करपे, राजेंद्र भिंताडे, सुदाम कडू, भगवानराव लोणकर, विलास करपे आदी बँकेच्या खातेदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नंदा लोणकर यांनी प्रास्ताविक केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.