डॉ. तुकाराम ठोक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
नाशिक : संस्कार, शिक्षण आणि अनुभवातून जीवनात प्रगती साधता येते. देवधर्म हा श्रद्धा, संस्कारांचा विषय आहे. परंतु, माणसात देव शोधण्याचे विचार डॉ. तुकाराम ठोक यांनी आपल्या ‘गोष्ट देवधर्माची’ या पुस्तकातून मांडले आहेत. सेवा-कर्तव्यातून देव-धर्माची गोष्ट अधोरेखीत होत असल्याचे प्रतिपादन आ. माणिकराव कोकाटे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील भूमिपूत्र तथा पुणे येथील सीए डॉ. तुकाराम ठोक यांनी लेखन केलेले गोष्ट देवधर्माची या पुस्तकाचे प्रकाशन नगरपरिषदेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिरात मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी खा. हेमंत गोडसे, माजी आमदार
राजाभाऊ वाजे, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक कृष्णाजी भगत, माजी अध्यक्ष अरविंद कारे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, संभाजी काळे, अण्णासाहेब गडाख, बबनराव ठोक, भारत कोकाटे, रामनाथ खुळे आदी उपस्थित होते.आ. कोकाटे म्हणाले, तुकाराम ठोक यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रगती केली. त्यांचे क्षेत्र आणि पुस्तक लेखन अतिशय वेगळा प्रवाह आहे. परंतु त्यांनी ते साध्य केले. फक्त पुजा, आरती, व्रत करुन उपयोग नाही, तर ते गुण आपल्या अंगी यायला हवे, यासाठी हा पुस्तक लेखन प्रपंच केल्याचे लेखक तुकाराम ठोक यांनी सांगितले. कार्यक्रमास सुलोचना ठोक, प्रकाश हांडे, राजेश खुळे, संदीप ठोक, अॅड. आदित्य बोरस्ते, राज शिंपी, अविनाश काळे, सुभाष ठोक, भारत शेंडे आदी उपस्थित होते.