नवी दिल्ली-
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे बिमस्टेक एक्वाटिक्स विजेतेपद स्पर्धा 2024 ला सुरुवात झाली. बिमस्टेक एक्वाटिक्स विजेतेपद स्पर्धेचे प्रथमच आयोजन केले जात आहे.
“जगातील 25 % लोकसंख्या दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियाई प्रदेशात राहते,” असे अनुराग सिंग ठाकूर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
7 बिमस्टेक देश एकत्र आल्याने बंगालचा उपसागर हा केवळ प्रवास आणि वाहतुकीसाठी वापरला जाणारा प्रदेशच नाही तर प्रगती, विकास आणि सहयोगाचेही क्षेत्र बनले आहे, असेही ते म्हणाले.
या स्पर्धेमुळे केवळ मैत्रीच नव्हे तर एक दृढ क्रीडा संस्कृती निर्माण होण्यास तसेच क्रीडापटूंमधील मैत्री आणखी घट्ट होण्यास मदत होईल. नेपाळ येथे झालेल्या शिखर परिषदेत आपल्या पंतप्रधानांनी या क्रीडा स्पर्धेची घोषणा करताना नेमका हाच विचार केला होता”, असे क्रीडा मंत्र्यांनी सांगितले.
ही संस्था इतिहासात प्रथमच क्रीडा स्पर्धेचे आयोजन करत आहे आणि या पहिल्याच स्पर्धेचे आयोजन भारतात केले जात आहे. 2018 मध्ये झालेल्या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेची घोषणा केली होती, सोबतच त्यांनी बिमस्टेक युवा जल क्रीडा स्पर्धा भारतात आयोजित करण्याची घोषणा केली होती. हा कार्यक्रम सुरुवातीला 2021 मध्ये आयोजित करणे प्रस्तावित होते, मात्र, नंतर जगभरात कोविड-19 साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यामुळे ही स्पर्धा 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आली.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय क्रीडा मंत्र्यांसह नेपाळचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री दिग् बहादूर लिंबू , बिमस्टेक चे सरचिटणीस इंद्रामणि पांडे, बिमस्टेकचे भारतातील उच्चायुक्त आणि राजदूत तसेच अतिथी देश आणि भारत सरकारमधील मान्यवर उपस्थित होते.
6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत दिल्लीच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जलतरण तलाव संकुलात पहिली बिमस्टेक एक्वाटिक्स विजेतेपद स्पर्धा आयोजित केली जात आहे. जलतरण, वॉटर पोलो आणि डायव्हिंग या जल क्रीडा प्रकारत 20 वर्षांखालील वयोगटासाठी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
या तीन क्रीडा प्रकारात एकूण 9 चषक आणि 39 पदके पणाला लागली आहेत. विविध बिमस्टेक सदस्य देशांतील 268 क्रीडापटूंसह 500 हून अधिक प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
बिमस्टेक (बंगालच्या उपसागराच्या परिसरातील देशांची बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीची संघटना) ही संघटना दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांमधील एक महत्त्वपूर्ण दुवा आहे. या संघटनेत दक्षिण आशियातील पाच सदस्य देशांचा (बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ आणि श्रीलंका) तर आग्नेय आशियातील दोन सदस्य (म्यानमार आणि थायलंड) देशांचा समावेश आहे.