पुणे: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिले. त्यानंतर पुण्यात अजित पवार गटाने फटाक्यांची आतषबाजी करत, एकमेकांना पेढे भरवून आपला आनंद साजरा केला.यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.फटाक्यांची आतिषबाजी केली.
नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालय परिसरामध्ये मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात नाचत आनंद साजरा केला.
कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून अजित पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, वनराज आंदेकर, दत्ता सागरे, शांतिलाल मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले, “”लोकशाहीमध्ये संख्याबळाला सर्वाधिक महत्त्व असते. निवडणूक आयोगाने त्याच आधारे निकाल दिला. अखेर सत्याचा विजय झाला आहे. अजित पवार यांनी निर्णय घेतला, त्याचवेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवकांपासून मंत्री, राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी होते. आता निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालातून दूध का दूध पाणी का पाणी झाले आहे.” शहराध्यक्ष मानकर यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.