चिन्ह आहे, नाव आहे..सत्ताही आहे..काय आहे तुमच्याकडे…?
आमच्याकडे साहेब आहेत.…
पुणे: शरद पवारांचे पुण्यातील शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले.. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे केवळ चिन्ह नव्हे, तर लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. चिन्ह आणि नाव गेलं तरी पवार साहेब आमच्याकडे आहेत, साहेबांचा विचार आमच्याकडे आहे. म्हणूनच, यापुढे साहेब हेच आमचं चिन्ह आणि साहेब हाच आमचा पक्ष मानून आम्ही ही लढाई लढणार आहोत.
ते पुढे म्हणाले, ” मूळ पक्षातून फुटून बाजूला गेलेल्या एका गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह आंदण देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक असून देशातील हुकूमशाही कोणत्या स्तराला गेली आहे याचं हे समर्पक उदाहरण आहे. प्रत्यक्ष जनतेत जाऊन मोत्यासारखा एक एक मोहरा निवडून त्यातून आदरणीय पवार साहेबांनी नेते घडवले, संपूर्ण राज्य अनेकदा पिंजून पक्षाची संघटना विणली आणि आज निवडणूक आयोगाने कष्टाने उभारलेला पक्ष सत्तेसाठी विचारांशी प्रतारणा करणाऱ्या एका गटाच्या हातात दिला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी कोणीच अस्तित्वात राहू नये या हीन मानसिकतेतून भारतीय जनता पक्षाने देशभरातील पक्ष फोडण्याचा, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून पक्ष व चिन्ह हिसकावून घेण्याचा किळसवाण धोरण राबवलं आहे, भाजपच्या हातातील बाहुलं असलेल्या निवडणूक आयोगाचं सहकार्य त्यांना नेहमीच लाभलं, भारतातील लोकशाही संपवण्याचा हा प्रयत्न असून भाजपचा हा प्रयत्न आम्ही नक्कीच हाणून पाडू.
अस्तित्वाचा हा लढा आम्ही न्यायालयीन मार्गाने तर लढूच, परंतु देशातील सर्वात मोठे न्यायालय असलेल्या जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही आता न्याय मागू. राज्यात घडलेल्या सर्व घटना जनतेने अनुभवल्या आहेत, म्हणूनच भारतीय जनता पार्टीला व त्यांच्या आहारी जाऊन आपल्या मूळ पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सर्वांनाच जनता कायमचा धडा शिकवेल हा आम्हाला विश्वास आहे.