निवारा जिम आणि व्ही थ्री फिटनेसच्या वतीने आयोजन
पुणे : आयुष्याच्या उत्तरार्धात व्यायामाला आपला सोबती बनवून आणि उत्साह, जिद्दीने मॅरेथॉन गाजविणाऱ्या ज्येष्ठ नागरिक धावपटूंचा सन्मान निवारा जीम आणि व्ही थ्री फिटनेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचा संदेश ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांना दिला.
यावेळी निवारा वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विश्वकुमार बडवे, विश्वस्त रवींद्र मराठे, विजय बेलसरे, वीणा देशपांडे, छाया काळे, डॉ. अरुण दातार, डॉ. आरती दातार, संजीव गावडे, व्ही थ्री फिटनेसचे संचालक विकास मालपुटे उपस्थित होते. यावेळी ३५ ज्येष्ठ नागरिक सभासदांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. अरुण दातार म्हणाले, व्यायाम हा शेवटपर्यंत करायचा असतो. व्यायामाला वयाचे कोणतेही बंधन नाही. वृद्धत्व हे टाळू शकत नाही परंतु योग्य व्यायामाने ते लांबवता येईल.
विकास मालपुटे म्हणाले, १९९६ साली निवारा वृद्धाश्रमातील व्यायाम शाळेची सुरुवात झाली. लोकांना एकत्रित आणून त्यांना व्यायामासाठी प्रेरणा देणे हे व्यायाम शाळेचे प्रमुख ध्येय होते. ज्येष्ठ नागरिकांना व्यायामासोबतच धावण्यासाठी देखील प्रोत्साहन आणि मार्गदर्शन इथे केले जाते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक धावपटू मॅरेथॉन मध्ये देखील धावतात.