पश्चिम महाराष्ट्रात १८ लाख थकबाकीदारांकडे ३३२ कोटींची थकबाकी
पुणे, दि. ०६ फेब्रुवारी २०२४: वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर होत आहे. सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १७ लाख ८५ हजार वीजग्राहकांकडे ३३२ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला असून ५० हजार १३६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
पुणे प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक घरगुती १५ लाख ८६ हजार ग्राहकांकडे २२१ कोटी ६३ लाख रूपये तसेच वाणिज्यिक १ लाख ६५ हजार ग्राहकांकडे ६७ कोटी ४० लाख रूपये तर औद्योगिक ३३ हजार ग्राहकांकडे ४३ कोटी ७६ लाख रुपयांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीमुळे वसूली मोहिमेला वेग देण्यात आला आहे. थकबाकीदारांचा केवळ वीजपुरवठा खंडित करणे हा महावितरणचा उद्देश नाही. परंतु वारंवार आवाहन किंवा विनंती करूनही जे थकबाकीदार थकीत वीजबिलांची रक्कम भरण्यास दाद देत नाहीत त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे मंगळवार (दि. ६) पर्यंत (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- २०९ कोटी ३६ लाख रुपये (८,५८,३१०), सातारा- २१ कोटी २१ लाख (१,९३,५६०), सोलापूर- ४६ कोटी ४१ लाख (२,५७,७९६), कोल्हापूर- ३१ कोटी ७० लाख (२,५९,१८६) आणि सांगली जिल्ह्यात २४ कोटी १० लाख रुपयांची (२,१६,०९६) थकबाकी आहे. या थकबाकीमुळे गेल्या ३५ दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ५० हजार १३६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्हा- २८ हजार ५५८, सातारा- ५,३६५, सोलापूर- ५,५९८, कोल्हापूर- ४,७४१ आणि सांगली जिल्ह्यातील ५,८७४ थकबाकीदारांचा समावेश आहे.
आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. सोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.
वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. सोबतच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.