मुंबई : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिले.
मंत्री कु. तटकरे यांच्या मंत्रालयातील दालनात आज दुपारी आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव उपस्थित होते, तर एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला बचत गटांना गरम ताजा आहार पुरवठ्याची कामे द्यावीत. यावेळी केंद्र सरकारकडे दर सूचीबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी महिला बचत गटांच्या समस्या जाणून घेतल्या.