मुंबई: पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या घेतलेली भेटीवरून टिका होत असतानाच आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज यावरून टीकास्त्र डागले आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या. यावरून आता राज्यात विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली आहे.
गणपत गायकवाडांच्या आरोपांना मुख्यमंत्र्याच्या पुत्राने पुष्टी दिली. कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने चक्क वर्षा निवासस्थानी जावून मुख्यंत्र्यांच्या पुत्राची भेट घेतली. याचा अर्थ महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे. याच मुख्यमंत्र्यांच्या काळात वर्षा निवासस्थानावर ड्रग प्रकरणातील आरोपीने गणपतीची आरती केली होती. ह्या आगोदर शिंदे गटातील आमदार पुत्राने बिल्डरचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली होती. उपमुख्यंत्र्यांच्या पुत्राने गंभीर आरोप असलेल्या गजा मारणेची भेट घेतली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मुलं गुंडांची पक्षात भरती करत आहेत. असा हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
दरम्यान, या भेटीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जय महाराष्ट्र करत महाराष्ट्रात गुंडाचे राज्य सुरू असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच पोलिस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात. गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीत जबाबदार कोण ? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या. ? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल ? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत. असे राऊतांनी म्हटले आहे.