पुणे-पुणे मेट्रोपॉलिटन डिस्ट्रिक्ट टेनिस असोसिएशन (पीएमडीटीए) तर्फे आयोजित जिल्हा स्तरावरील टेनिस स्पर्धेत पुरुष खुल्या गटात अर्जुन अभ्यंकरने अजिंक्यपद पटकावले. मिलेनियम स्कूलमधील टेनिस कोर्टवर खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत जवळजवळ १०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत अग्रमानांकित असलेल्या अर्जुन अभ्यंकरने उपांत्यपूर्व फेरीत नील जोगळेकरवर ७-१ अशी सहज मात केली. तर उपांत्य फेरीत अर्जुनने चतुर्थ मानांकित अनमोल नागपुरेचा ४-२ ५-४(३) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात सुमारे अडीच तास चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत अर्जुनने तृतीय मानांकित पॉलवर ३-५ ५-४(३) ४-२ असा विजय नोंदवत विजेतेपदाच्या चषकावर स्वतःचे नाव कोरले.
अर्जुन अभ्यंकर हा बी.एम.सी.सी. महाविद्यालयाचा एफ.वाय.बी.कॉम.चा विद्यार्थी असून सोलारिस क्लब येथे प्रसनजीत सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. या यशामुळे अर्जुनला राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान प्राप्त झाला आहे.