डॉ. मिलिंद कांबळे, इंदुमती जोंधळे, डॉ. अविनाश भोंडवे, देविका घोरपडे, सचिन खिलारी, वीरपत्नी दीपाली मोरे यांना उर्जा पुरस्कार
डॉ. सदानंद मोरे, डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. बाबा आढाव, डॉ. प्रकाश आमटे यांची विशेष उपस्थिती; उषा काकडे यांची माहिती
पुणे : ग्रॅव्हिट्स फौंडेशनतर्फे सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ समाजसेविका आणि हेमलकसा (भामरागड) येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या प्रवर्तक डॉ. मंदाकिनी आमटे यांना यंदा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिले जाणारे उर्जा पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. येत्या बुधवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२४) रोजी सकाळी ११ वाजता आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे या उर्जा पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उषा काकडे यांनी दिली.
उषा काकडे म्हणाल्या, “ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी उर्जा पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचा वारसा घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात गेली पाच दशके डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शिक्षण, आरोग्य सेवेचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे यांना यंदा ‘उर्जा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.”
यासह दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. मिलिंद कांबळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बॉक्सर देविका घोरपडे, आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता दिव्यांग गोळाफेकपटू सचिन खिलारी यांना यंदाचा ‘उर्जा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच वीरपत्नी दीपाली मोरे यांना शहीद जवान विजय मोरे यांच्या स्मरणार्थ ‘शौर्य पुरस्कार’ दिला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभात पाहुणे म्हणून सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित राहतील. डॉ. बाबा आढाव व डॉ. प्रकाश आमटे, माजी खासदार संजय काकडे यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती असणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे हे दहावे वर्ष असून, प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांना समाजासमोर आणून त्यांचा गौरव करण्याचा हा प्रयत्न आहे,” असे उषा काकडे यांनी नमूद केले.
फाउंडेशनचे सल्लागार अरुण खोरे म्हणाले, “ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे नियमितपणे शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण या क्षेत्रात योगदान देत आहेत. समाजामध्ये प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला उर्जा मिळावी, यासाठी दरवर्षी समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना उर्जा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. यासह ‘गुड टच बॅड टच’ सारखे उपक्रम सामाजिक जाणीव निर्माण करणारे आहेत.”