कलाक्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया
पुणे : ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रामायणातील व्यक्तिरेखा असलेल्या नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. नाटकातील संवादातून, हाव भावातून भावना दुखावल्या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे रामायणातील व्यक्तिरेखा असलेले नाटक शुक्रवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी बंद पाडले. पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्याचा, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. त्यामुळे नाटकाबाबत वाद होऊन कार्यकर्ते, कलाकार विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. हे प्रकरण पोलिसांत तक्रार दाखल करण्यापर्यंत गेले.चतुःशृंगी पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.हर्षवर्धन सुनील हरगुडे, वय २२, रा. सदाशिव पेठ, पुणे यांच्या तक्रारीवरून चतुःशृंगी पोलिसांनी गुरन १४३/२०२४ भादंवि कलम २९५ (अ), २९४, १४३, १४७, १४९, ३२३ व सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ अनुसार संशयित आरोपी १. डॉ. प्रवीण भोळे २. भावेश पाटील ३. जय पेढणेकर ४. प्रथमेश सावंत ५. हृषीकेश दळवी ६. यश चिखले व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
नेहमी भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असलेल्या कलाक्षेत्रातील काहींनी यांनी या नाटकावरून टीका केली. कोण आहेत ही लोकं? कोण आहेत हे शिक्षक जे असले ‘ललित’ विद्यार्थी घडवत आहेत? ‘वैचारिक दारिद्र्य’ आणि ‘वैचारिक अधोगती’ आहे ही. आम्ही धिक्कार करतो या विकृतीचा, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.तर काहींनी मात्र विचार स्वातंत्र्य , लिखाण स्वातंत्र्य , व्यक्ती स्वतंत्र्याचा हवाला देत विडंबनात्मक साहित्याचा उल्लेख करून त्यावर हल्ला करणे उचित नसल्याचे म्हटले आहे.