भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ माजली आहे. आता या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. त्यात गणपत गायकवाड हे शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर खुलेआमपणे गोळीबार केल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी आपण स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा केला होता. पण या फुटेजमुळे त्यांचा हा दावा निखालस खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे.
गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उल्हासनगरच्या हिल पोलिस ठाण्यात शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरमी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना अटक केली आहे. जमिनीचा वाद व आपसातील वैमनस्यातून ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. सध्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
गोळीबाराच्या या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात भाजप आमदार गणपत गायकवाड शांतपणे खुर्चीत बसलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करताना दिसून येत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, गायकवाड यांनी एकूण 7 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 6 गोळ्या महेश यांना लागल्या. भयंकर म्हणजे गणपत गायकवाड व्हिडिओत गोळीबार केल्यानंतरही थांबताना दिसत नाहीत. ते गोळ्या लागल्यानंतर खाली महेश यांना जवळ जावून बेदम मारहाण करतानाही दिसून येत आहेत.
व्हिडिओत गोळीबाराचा आवाज ऐकून पोलिस अधिकारी धावत घटनास्थळी येतानाही दिसून येत आहेत. तर त्यावेळी तिथे उपस्थित असणारी इतर मंडळी पळून जाताना दिसत आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश शिंदे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून, ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्याला या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केलेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवत आहेत. ते मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. शिंदे यांनी आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज गुन्हेगार बनवले. मनस्ताप झाल्यामुळे मी ही फायरिंग केली. या कृत्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. कारण माझ्यासमोर माझ्या मुलाला पोलिस स्टेशनमध्ये धक्काबुक्की करत असतील तर मी काय करणार? पोलिसांच्या धाडसामुळे महेश गायकवाड वाचला. पोलिसांनी धाडस करून मला पकडले. मी महेश गायकवाडला जीवे मारणार नव्हतो. पण माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करावे लागले.