एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे डॉ. राजेंद्र सिंह, जी. रघुमान व डॉ.अशोक गाडगीळ यांना भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
पुणे, दि.३ फेब्रुवारी: “ सृष्टीच्या कल्याणासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांना निसर्गाप्रती संवेदनक्षम होण्याची गरज आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचमहाभूते भारतीयांसाठी देव होते. आपल्याला ही वैज्ञानिक समज मिळाली आहे आणि आत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाला मानव आणि निसर्गाप्रती अधिक संवेदनशील बनवायला हवे.” असे विचार आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ व रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट,पुणे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान समारंभ संपन्न झाला. त्या प्रसंगी पुरस्कार स्विकारल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
यावेळी जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितिचे निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीएओ डॉ. संजय कामतेकर, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे व प्रा. शरदचंद्र दराडे पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी नॅशनल रेल अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूटचे प्रा. जी. रघुराम यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार, डॉ. राजेंद्र सिंह यांना भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ आणि कॉलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील सेफ वॉटर अँड सॅनिटेशनचे प्रा. डॉ. अशोक गाडगीळ यांना भारत अस्मिता विज्ञान तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी सव्वा लाख रूपये, सन्मानपत्र व स्मृती चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले,“ देशातील शहरी केंद्रांमध्ये गावांच्या तुलनेत अधिक सुविधा व संसाधने आहेत. शास्त्रज्ञ सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाण्याचे संकट सोडवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्याचा आपल्या जैवविविधतेवर परिणाम होईल.”
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“अस्थिर जगात, प्रत्येकजण भारताबद्दल आशावादी आहे. भारत संस्कृती आणि वारसा यांनी समृद्ध असल्याने भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतीय लोक करूणा व संवेदनशीलतेने समृद्ध आहेत. भारत अस्मिता पुरस्कार विजेते खर्या अर्थाने युवकांचे प्रतीक आहेत. तरूणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरावी यासाठी लक्ष केंद्रित करण्याची शपथ घेतली पाहिजे.”
डॉ. रघुराम म्हणाले,“आम्ही आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो, परंतु लेखा आणि सल्लागार क्षेत्रातील स्वावलंबनापासून आपण मुकलो आहोत. सल्लागार क्षेत्रातील सर्व भारतीय कंपन्या जागतिक स्तरावर विकल्या गेल्या आहेत. आम्ही आमचे ब्रँड पुन्हा एकदा प्रत्यक्षात आणले पाहिजेत.”
डॉ. गाडगीळ म्हणाल,“गरीबी कमी करण्यासाठी व विकसनशील देशांना न्याय मिळवून देण्यासाठी विलक्षण आव्हानांना तोंड देत आहोत. विकास अभियांत्रिकी नावाचे एक नवीन क्षेत्र जे अभियांत्रिकी, सामजिक विज्ञान, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी यांचे संयोजन आहे, ते आव्हान आपण कसे पेलणार हे शोधाण्यासाठी उदयास येत आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारत अस्मितेबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला अहंकार किंवा अनावश्यक अभिमान नसतो. पुरस्कार विजेते आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत. आपल्याला भवितव्याच्या कल्याणासाठी व मुल केंद्रित शिक्षण, महिला केंद्रित कुटुंब, विकासासाठी ज्ञान केंद्रित समाज आणि नवकल्पना केंद्रित भारत असावा.”
राहुल व्ही कराड म्हणाले,“भारत अस्मिता पुरस्कार हा आपला राष्ट्र गौरव निर्माण करणार आहे. आपण भारतीय मूळ विचारवंत आणि स्व मुक्त राष्ट्र आहोत. आपण विकसित देशांकडून शिकले पाहिजे. आजच्या काळात सर्व युवकांनी आपली विचारधारा म्हणजेच वसाहतवादी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा उच्चारणात आपलेपणा जाणवतो.”
या प्रसंगी प्रख्यात कम्प्यूटर शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्हिडिओ द्वारे उपस्थितांना संबोधित केले.
कुलगुरू डॉ. चिटणीस यांनी घोषणा केली की ३ फेब्रुवारी रोजी डॉ. विश्वनाथ कराड यांचा वाढदिवस यापुढे मार्ईर्स एमआयटीच्या सर्व संस्थेमध्ये फाउंडर्स डे म्हणून साजरा केला जाईल.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले..