एमएसएमई मंत्रालय व एआयसी पिनॅकल यांच्या वतीने आयोजन; ‘आयपी’चे महत्व होणार अधोरेखित
पुणे : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी – आयपी राईट्स) यात्रा आयोजिली आहे. शनिवार, दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (एमसीसीआयए) सभागृहात या यात्रेचे आयोजन केल्याची माहिती एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरमचे अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यांनी दिली.
डॉ. सुधीर मेहता म्हणाले, “राष्ट्रीय आयपी यात्रा हा आयपी संस्कृतीला प्रोत्साहन देणारा एमएसएमई मंत्रालयाचा उपक्रम आहे. बौद्धिक संपदेच्या हक्कांबाबत जागृती, सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन, कल्पना आणि इनोव्हेशनचे संरक्षण, प्रगत तंत्रज्ञान अंतर्भूत करून एमएसएमई सक्षम करण्यासह व्यावसायिक धोरणांना बौद्धिक संपदा हक्काची जोड देऊन क्षमता वाढविण्यावर यामध्ये भर दिला जात आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या बौद्धिक संपदेची नोंद करण्यास सहकार्य करण्याचे ध्येय या उपक्रमाचे आहे. एमएसएमईना देशभरातील आयपी फॅसिलिटेशन सेंटरशी जोडण्याचे काम होत असून, नवोन्मेषकांना सर्जनशील क्रियाकलाप प्रदर्शित करण्यासह प्रोत्साहन, मार्गदर्शन, निधी आणि सहाय्य पुरवले जात आहे.”
यात्रेदरम्यान ‘वैश्विक दृष्टीकोनातून बौद्धिक संपदा’, ‘प्रोटेक्टिंग युअर ब्रँड’, ‘इंटरनॅशनल प्रॅक्टिसेस ऑन आयपीआर’, ‘आयपीआरचा व्यवसाय वृद्धीवर होणारा परिणाम’, ‘व्यवसायवाढ आणि स्पर्धात्मकतेसाठीची बौद्धिक संपदा’, ‘खोट्या जाहिराती, उल्लंघनाच्या समस्या आणि आव्हाने’, ‘स्टार्टअप आणि एमएसएमईसाठी बौद्धिक संपदेचे मुद्रीकरण’ आणि ‘बौद्धिक संपदा नोंदीची प्रक्रिया’ अशा विषयांवर मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. एमएसएमई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आयपी प्रॅक्टिस करणारे वरिष्ठ व्यासायिक, विधिज्ञ, यशस्वी स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील लोक सहभागी होणार आहेत, असे डॉ. मेहता यांनी नमूद केले.
एआयसी पिनॅकल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल म्हणाले, “यात्रेच्या उद्घाटनासाठी पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता, एमएसएमईच्या विकास आयुक्तालयातील आयपीआर सहायक संचालक सतीश कुमार, निवृत्त वरिष्ठ पेटंट सहनियंत्रक डॉ. के. एस. कर्दम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. नितीन तिवारी, पेटंट विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. बी. पी. सिंग, डॉ. मोहन दिवाण, श्रीधर परुंडेकर, स्वप्नील सानप, वेदांत पुजारी, अजित राऊळ, शैलेंद्र भंडारे, ऋजुता मेहेंदळे, आरती भटनागर, सुधा कन्नन आदी वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. आयपीआर प्रोफेशनल्स, डिझाईन प्रोफेशनल्स, शास्त्रज्ञ, स्टार्टअप, विधिज्ञ, विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय बौद्धिक यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या यात्रेत सर्वाना विनामूल्य सहभागी होता येणार आहे. इच्छूकांनी आपली नावनोंदणी www.aic-pinnacle.org किंवा ९३०७३०५१८१ या व्हाट्सअप नंबर करावी.”
भारतामध्ये एक मजबूत नवोन्मेषक म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे. इनोव्हेशनला प्रोत्साहन व सहकार्य देण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने देशभरात आयपी सुविधा केंद्रे उपलब्ध करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. पेटंट, ट्रेडमार्क, डिझाइन आणि कॉपीराइट फाइलिंगसाठी याआधी मोठ्या संख्येने एमएसएमईला साहाय्य केले आहे.
– डॉ. सुधीर मेहता, अध्यक्ष, एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम
एआयसी-पिनॅकल विषयी:
एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम ही ना नफा, सेक्शन-८ कंपनी आहे. नाविन्यपूर्ण निर्मिती आणि स्टार्टअप्सचे इनक्यूबेटिंग सुलभ करण्यासाठी उद्योग भागधारकांद्वारे समर्थित आहे. एआयसी पिनॅकल, स्टार्टअप इनक्यूबेटर म्हणून भारतातील सर्वसमावेशक आणि शाश्वत तांत्रिक-सामाजिक-आर्थिक विकासाकडे नेणाऱ्या प्रमुख क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दोलायमान आणि उच्च-प्रभावी उद्योजकीय परिसंस्थेच्या निर्मितीला साहाय्य करते. एआयसी पिनॅकलला अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग, एमएसएमई मंत्रालयाचे विकास आयुक्तालय, इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार, औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, पिनॅकल इंडस्ट्रीजचे सहकार्य लाभले आहे. एआयसी पिनॅकलने आजवर ७५ पेक्षा अधिक स्टार्टअपना इन्क्युबेट केले आहे. तसेच एआयसी पिनॅकल एमएसएमई मंत्रालयांतर्गत बौद्धिक संपदा सहायता केंद्र आहे. एमएसएमईना विनामूल्य आयपी फायलिंग व मार्गदर्शन पुरविण्याचे काम एआयसी पिनॅकल करते.