अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून ३५ लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे, दि. १: अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड येथे बुधवारी (ता.३१) छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने मोठी कारवाई करत ३५ लाख ७३ हजार ५४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.
या कारवाईमध्ये ४ मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले १०५ सिलेंडर व रिकामे ६०२ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत आरोपी भिकचंद हिरालाल कात्रे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
श्री. कात्रे यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात भादवी कलम ४२०, २८५, २८६ सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ नुसार तसेच एलपीजी (पुरवठा व वितरण आदेश) आदेश २००० चे कलम ३ ते ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक श्रीमती स्नेहल गायकवाड, अमोल हाडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे आदींनी केली आहे, असेही श्री. गिते यांनी कळविले आहे.